परभणीच्या स्त्री रुग्णालयाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारची टाळाटाळ,  

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मदतीची मागणी - 

आमदार बाबाजानी दुर्राणी यांंच्या तारांकित प्रश्नावर आरोग्यमंत्री सावंत यांची विधानपरिषदेत माहिती

परभणी/प्रतिनिधी

परभणीतील स्त्री रुग्णालयाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मदतीची मागणी करण्यात आली आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांंच्या तारांकित प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानपरिषदेत ही माहिती दिली आहे.

परभणी जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत आ.दुर्राणी, आ.सतिश चव्हाण, आ.विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला दिनांक 4 मार्च 2022 रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेल्या 100 खाटांच्या स्त्री रूग्णालय इमारत बांधकामासाठी रुपये 8 कोटींचा निधी मिळाला नसल्याने इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही, हे खरे आहे काय? असल्यास, जिल्हा आरोग्य सोसायटीने हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाढीव रुपये 8.20 कोटी निधीची मागणी केल्यानुसार केंद्र शासनाला दिनांक 1 जुलै 2021 रोजी वाढीव निधी मंजूर करण्यास्तव केलेली विनंती मान्य करण्यात आली आहे काय? असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उर्वरित रुपये 8 कोटी निधी मंजूर करून स्त्री रूग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत? असे मुद्दे मांडण्यात आले. त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय बांधकामास अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडून दिनांक 1 जुलैं 2021 रोजी केंद्र शासनाला रुपये 820.76 लक्ष निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. दिनांक 8 मार्च 2022 रोजी केंद्र शासनास आयुक्त , आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. तथापि , त्यास अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही. आयुक्त , आरोग्य सेवा यांचे कार्यालयाकडून दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन मंडळ किंवा इतर स्रोतामधून निधी उपलब्ध करुन घेण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. तसेच दिनांक 29 जून 2022 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक परभणी यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.