अकोला :आराध्य दैवत श्री राजराजेश्वरला श्रावण महिन्याच्या आधी सोमवारी भव्य जलाभिषेक करण्यात येतो. यासाठी कावडधारी रविवारी सकाळपासून पूर्णा नदीतून जलद भरुन आणण्यासाठी निघणार आहेत शनिवारी शहरात चौकाचौकात आणि रस्त्यांवर कावड बांधण्याचे काम सुरु होते. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा कावडधारीमध्ये प्रचंड उत्साह आहे.

हरिहर पेठ मंडळ, राजेश्वर पालखी, खोलेश्वर, जागेश्वर, बाबळेश्वर मित्रमंडळ, जय महाकाल आदी मंडळांनी पालखी व कावड महोत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. मंडळांमध्ये घागर, देखाव्यांमध्ये चढाओढ आहे. हरिहर भक्त मंडळ, डाबकी रोड वासी मंडळ, जय बाबळेश्वर शिवभक्त मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, हरिहर पेठ मंडळांच्या कावड सर्वाधिक घागरीच्या असतात.

यंदा मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मंडळांकडून शेकडो घागरीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे. टिळक रोड, जुना कापड बाजार येथून मोठ्या कौशल्याने या भव्य कावड पालखी मार्गक्रमण करणार आहेत. कावडी सोबत देखावेही बघावयास मिळणार आहे. जय भवानी, महाकाल, शंभो, राधाकृष्ण, शिवलिंग असे देखावे कावड पालखी मध्ये राहणार आहेत.

शेगाव संस्थान पालखी देखावा यांचे आकर्षण या वर्षी हरिहर भक्त मंडळ ७७१ घागरी ची कावड असणार आहे. सोबतच हरिहराची १० फूट उंच मूर्ती आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारत मातेचा देखावा कावड सोबत असणार आहे. जय बाबळेश्वर शिवभक्त मंडळाचा देखावा यंदाही आकर्षण ठरणार आहे. यावर्षी मंडळाकडून शेगाव संस्थान च्या श्री संत गजानन महाराज पंढरपूर पालखी सोहळ्याचा देखावा तयार करण्यात येत आहे. देखाव्यांमध्ये वारकरी, पालखी, कावड, विठ्ठलाचे मूर्ती, ज्ञानेश्वरी ग्रंथ, छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा असेल. जय भवानी मित्र मंडळ हरिहर पेठ मंडळाकडून भवानी माता आणि शंकराचा देखावा पालखीसोबत असेल. यंदा मंडळाची कावड २१०० घागरची असल्याचे सांगण्यात आले. .