लाडक्या सर्जा-राजासाठी बळीराजा झाला सज्ज..
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बैल पोळ्याच्या साहित्य खरेदीसाठी पाचोड आठवडी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी....
पाचोड(विजय चिडे)बळीराजांचा आवडता सण बैलपोळा यंदा धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.यावर्षी कोरोना संसर्ग आटोक्यात आहे. तसेच समाधानकारक पाऊस देखील झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी झूल, रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी रविवारी पाचोड ता.पैठण येथील आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले.तसेच जीएसटीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाच ते दहा टक्के भाव वाढ झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने आपल्या ढवळ्या-पवळ्याला सजविण्यासाठी यंदाही बाजारात घुंगरमाळा, पितळी साखळी, कासरे, मठाठा, वेसणी जोड, सुती गोंडे, सूत, बाशिंग,शिंग गोंडे, केसारी, मणी माळा, पितळी चैन, झुली, चंगाळे, मोरक्या, वेसनी, गुघरं, पैंजन, कवडीमाळ, तिरंगा माळ, छमडी गोंडा,रंगीबिरंगी गोंडे, घंट्यांच्या माळा आदी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली होती.
त्यामुळे दिवसभर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या त्याच्या सुख-दु:खात सोबत राहणाऱ्या ढवळ्या पवळ्याचा सण म्हणजे बैलपोळा. शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण शेतकरी थाटात साजरा करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी करीत सजावट साहित्य खरेदी केले.
शेतामध्ये पूर्वी जी कामे करण्यासाठी बैलांचा उपयोग होत होता, त्यापैकी आता बहुतांश कामे ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राचा वापर करून केली जातात. त्यामुळे बैलांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे अनेक अडचणी भासतात. परंतु आजही ग्रामीण भागात परंपरा म्हणून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात येतो.