साळेगाव ता. केज येथील आठवडी बाजारातून खरेदी केलेले ६ बैल कत्तलखान्याकडे घेऊन निघालेले पिकअप सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केज शहरातील शिवाजी चौकात गुरुवार दि. १८ सकाळी ११.१५ वा. च्या सुमारास पकडले. पोलिसांनी १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे बैल आणि ६ लाख रुपये किंमतीचे पिकअप ताब्यात घेतले असून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
साळेगाव ता. केज येथील आठवडी बाजारातून बैल खरेदी करून कत्तलखान्याकडे पिकअपमध्ये घालून घेऊन जात असल्याची गुप्त माहिती केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्या नुसार सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे, जमादार बालासाहेब दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे यांच्या पथकाने गुरुवारी दि. १८ सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास केज शहरातील शिवाजी चौकात साळेगाव येथून कळंब रस्त्याने आलेले पिकअप क्र. (एम एच-४४/ यु-०४४५ ) सापळा रचून पकडले. पथकाने पिकअपची पाहणी केली असता बैल हे निर्दयीपणे घालण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर पिकअप चालक दस्तगीर सल्लाउद्दीन शेख ( रा. कळंब रोड, केज ) याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुलाब मनोहर वाघमारे ( रा. परळी ) यांच्या सांगण्यावरून बैल हे परळीकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली. बैल हे कत्तलखान्याकडे जात असल्याची खात्री पटल्यानंतर पथकाने ७५ हजार रुपये किंमतीचे ३ खिल्लार बैल, ५० हजार रुपये किंमतीचे २ जर्शी बैल, २५ हजार रुपये किंमतीचा १ गावरान बैल आणि ६ लाख रुपये किंमतीचा पिकअप ताब्यात घेतला. सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे यांच्या फिर्यादी वरून पिकअप चालक दस्तगीर शेख, गुलाब वाघमारे या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात जमादार श्रीकांत चौधरी हे तपास करीत आहेत.