आज कोकणसह मराठवाड्यात ‘यलो’ अलर्ट तर विदर्भात ‘ऑरेंज’ अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई :- महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्यानं आज (20 ऑगस्ट) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही यलो अलर्ट दिला आहे. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथेही यलो अलर्ट जारी केलाय. दरम्यान, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा इथे आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, 21 ऑगस्टला म्हणजे उद्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे.