अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात येईल .शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे .एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला . कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा बोरगांव धांदे, मौजा रायपूर (कासारखेड ), मौजा इसापूर तसेच मौजा भातकुली येथील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जावून 

शेतकरी , ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते . कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रमुख वर्षा टापरे , महसूल उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी राजेश वालदे , उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले , अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये . बांधावर जाऊन उर्वरित पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी. येत्या आठवडाभरात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानाची भरपाई मिळेल , असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली.