फुलंब्री तालुक्यात शिवसेनेची मुहूर्तपेढी १९८७ मध्ये रोऊन आज पर्यंत अविरतपणे शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी काम करणारे शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात गुरुवार (ता.18) दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोघांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रवेश करून घेतला आहे.
फुलंब्री तालुक्यात 1987 पासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेले राजेंद्र ठोंबरे यांनी मागील गेल्या 35 वर्षात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहिलेले आहे. या 35 वर्षांमध्ये शिवसेनेचे एक निष्ठेने काम करीत कधी सत्तेत तर कधी विरोधात जाऊन आक्रमक भूमिका घेतली होती. 1987 मध्ये राजेंद्र ठोंबरे यांच्यावर शाखाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 1988 मध्ये विभाग प्रमुख तर 2000 ते 2022 म्हणजे तब्बल 22 वर्ष शिवसेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी राजेंद्र ठोंबरे यांच्यावर होती. शिवसेनेचे काम करीत असताना या काळामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2007 ते 2010 या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राजेंद्र ठोंबरे यांना बसून शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर या काळात सातत्याने जनतेचे कामही ठोंबरे यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर तळागाळातील शिवसैनिक व जनतेच्या कामांना योग्य न्याय दिला आहे. याच काळात फुलंब्री तालुक्याचा अध्यक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली होती. तब्बल 35 वर्ष शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाने दिलेली जबाबदारी चोखरीत्या सांभाळण्याचे काम ठोंबरे यांनी केले आहे. याच काळात पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. मात्र सध्याचे राजकारण पाहता कठोर निर्णय घेऊन शिवसेना तालुका अध्यक्ष पदाचा राजेंद्र ठोंबरे यांनी राजीनामा देत शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेला फुलंब्री तालुक्यात मोठे खिंडार पडले असल्याचे दिसून येऊ लागले आहे.