गोविंदा रे गोपाळा... म्हणत थरावर थर रचणारी गोविंदा पथके, डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईचा सळसळता उत्साह, उंचावरील खुणावणारी दहीहंडी, एकावर एक थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेले शथीर्चे प्रयत्न अन् श्वास रोखून हा थरार अनुभवणारे दर्शक अशा उत्साही वातावरणात गुरुवारी दहिहंडीचा उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रंगला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दुपारपासूनच उत्साही वातावरण पसरले होते. मच गया शोर सारी नगरी रे.., गोविंदा आला रे आला..,ढाकुमाकूम..ढाकुमाकूम... सारख्या हिंदी -मराठी गाण्यांवर नाचणारे गोविंदा पांढर्या, लाल, पिवळ्या, काळया, पोपटी रंगाचे टी शर्ट घालून कपाळाला गोविंदांची पट्टी बांधून दहीहंडी फोडण्यासाठी तयार झाले होते. मातृभूमी युवा संघाने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त महिला व पुरुषांसाठी स्पर्धा ठेवली होती. आकर्षक बक्षीस मिळविण्यासाठी गोविंदांची स्पर्धा लागली होती.
दहीहंडी पर्यंत पोहचण्यासाठी एकुण सात पथके सहभागी झाली. सळसळता उत्साह, सोबत खिळाडूवृत्ती आणि संगीताचा अशा वातावरणात दहीहंडीपर्यंत पोहचण्यासाठी पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. आवाक्याबाहेर वाटणार्या दहीहंडीला सलाम ठोकत हे गोविंदा कधी घसरत होते तर कधी शिस्तबद्धपणे थरानुसार उतरत होते. दहीहंडी फोडण्याचा अपयशी ठरलेल्या प्रयत्नानंतरही उपस्थितांमधून झालेला जल्लोष गोविंदा पथकाचे मनोबल उंचावणारा ठरत होता. आणि मग पुन्हा तोच प्रयत्न. शेवटी भोईराज गल्ली चौफाळा फाटा नांदेड हे पथक दहीहंडी पर्यंत पोहचून फोडण्यात यशस्वी झाला.
या गोविंदा पथकांचा प्रयत्न हजारो उपस्थितांनी श्वास रोखून अनुभवला. डिजेच्या तालावर नाचताना गोविंदा पथकांचे हंडी फोडण्यासाठी चाललेले शर्थीचे प्रयत्न, गोविंदा आला रे... च्या आरोळ्या, थर सुटल्यानंतरही उत्साही प्रोत्साहन आणि श्वास रोखून पाहत असताना दहीहंडी फोडल्यानंतर झालेला उपस्थितांचा एकच जल्लोष. अशा प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पुण्या- मुंबईत होणारा दहीहंडीचा थरारक अनुभव वाशीमकरांनी रात्रीपर्यंत अनुभवला
कृष्ण जन्मोत्सवनंतर दहीहंडीची लगबग सुरु होते. दहीहंडी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. आज वाशीमध्ये दहीहंडीचा सण साजरा करण्यात आला. कोरोनामध्ये अनेक सण उत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. यंदा मात्र प्रत्येक सण जल्लोषात साजरा केला जाणार यात काही शंका नाही. सगळे बालगोपाळही उत्सवासाठी सज्ज झाले आहेत.