अमरावती इ वरुड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूरप्रवण स्थिती उद्भवल्यामुळे सुमारे ६०० च्यावर नागरिक बेघर झाले आहेत. त्या नागरिकांचे युद्ध पातळीवर प्रशासनाने प्रारंभी तात्पुरते व कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असे निर्देश खासदार .डॉ. अनिल बोंडे यांनी अमरावती विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना आज येथे दिले. यावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी निर्णय घेत २१ ऑगस्टपर्यंत संपूर्ण प्लॅन तयार करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 विभागीय आयुक्त कार्यालयात राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर, आरडीसी आशिष बिजबल, महसूल, जलसंपदा, महावितरण, जलसंधारण जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, नियोजन यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वरुड तालुक्यात पूरप्रवण स्थिती निर्माण झाल्यामुळे सहाशेच्या वर नागरिक बेघर झाले आहेत. त्यांचे वास्तव्य आता अण्णाभाऊ साठे सभागृहात आहे.

 या नागरिकांचे प्रारंभी तात्पुरते पुनर्वसन आणि त्यानंतर कायमस्वरूपी पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यासाठी जागेचा शोध घ्यावा, वीज, पाणी, गॅस, रस्ते या संपूर्ण मूलभूत सुविधा प्रशासनाने त्यांना तात्काळ उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना डॉ. बोंडे यांनी केल्या. यावर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी तालुका प्रशासनाला कडक निर्देश देत या संदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठवन्याचे सांगितले. वरुड तालुक्यातील पूरप्रवनस्थितीमुळे अनेक नागरिकांची घरे वाहून गेली आहेत. विजेची सोय नाही. जीवनावश्यक वस्तू सुद्धा पाण्यात बुडाल्या आहेत ही स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याने प्रशासनाने तातडीने नागरिकांपर्यंत मदत पोहोचवावी. तसेच तालुक्यात नदी काठावर असलेले अनेक घर सुरक्षित रहावी यासाठी त्या ठिकाणी पूर संरक्षण भिंती बांधण्यात याव्या, पांदन रस्ते, पूल, स्लॅड्रेन, कोल्हापुरी व सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी. शेतीमधील इलेक्ट्रिक खांब पडलेले आहेत. तारा झुकलेल्या आहेत. शेतात शेतकरी काम करण्यास गेले तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. अनेक ठिकाणच्या विहिरी खचल्या आहेत. त्यामुळे यावर तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशा सूचना सुद्धा डॉ.अनिल बोंडे यांनी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना केल्या.