जितेंद्र जाधव

इंदापूर/प्रतिनिधी

भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची बीड येथे भेट घेऊन सांत्वन केले.

    शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षण लढ्यातील प्रमुख नेते माजी आमदार विनायकजी मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. बीड येथील तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हर्षवर्धन पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे, मुलगा आशुतोष मेटे, मुलगी आकांक्षा मेटे यांचे सांत्वन केले. गेली २५ वर्षातील विनायक मेटे यांच्या अनेक आठवणींना हर्षवर्धन पाटील यांनीयाप्रसंगी उजाळा दिला.

 मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळवून देणे, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे शिवस्मारक उभारणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाला अधिकचा निधी देणे, सारथी संस्थेचे सक्षमीकरण आदी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. या सर्व मागण्यांची पूर्तता करणे हीच विनायक मेटे यांनी खरी श्रद्धांजली ठरेल,असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.