शिरुर दिनांक (वार्ताहर ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात स्मारक व पुतळा व्हावा या मागणीसाठी पुणे जिल्हा लहूजी शक्ती सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे हे शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालया समोर उपोषणास बसलेले होते . आज उपोषणाचा चौथ्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, सांस्कृतिक भवन वाचनालय यांचेसाठी प्रस्ताव प्रकल्प तयार करण्याची कार्यवाही नगरपालिका करेल असे आश्वासन शिरुर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिल्यावर दादाभाऊ लोखंडे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले . स्मारक व पुतळाच्या प्रमुख मागणीसह शहरात झोपडपट्टीधारकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा, शहरातील लाटेआळी येथे अण्णाभाऊ साठे स्वागतकमान उभारावी व शिरूर तालुक्यातील सर्व गावात मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधवावे या मागण्यासाठी लोखंडे उपोषणास बसलेले होते . आज उपोषणकर्ते लोखंडे यांच्या समवेत मुख्याधिकारी स्मिता काळे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी चर्चा केली. यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोरेकर , भाजपाचे तालुकाध्यक्ष आबा सोनवणे , लहूजी शक्ती सेनेचे संजय फाजगे, विशाल जोगदंड, माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे , सतीश बागवे , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , विजय नरके , रामभाउ नेटके , नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक राहूल पिसाळ , बांधकाम विभागाचे पकंज काकड , दत्तात्रेय बर्गे , पंचायत समितीचे आधिकारी राम जगताप यांच्या सह विविध संस्था संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते . मागण्याच्या संदर्भात पालिकेने पत्र दिल्यावर लोखंडे यांनी उपोषण मागे घेण्यात आले . पालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांचे स्मारक व पुतळा संदर्भातील मागणीच्या अनुषंगाने शिरुर शहरातील विकास आराखडयामध्ये आरक्षित जागा किंवा इतर उपलब्ध जागा बाबत सर्वे करुन निर्विवाद असणारी जागा नगरपरिषद प्रशासकीय ठराव घेऊन मान्यते करीता शासनाकडे सादर करेल, सदर जागा उपलब्ध झालेनंतर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, सांस्कृतिक भवन वाचनालय यांचेसाठी प्रस्ताव प्रकल्प तयार करण्याचीही कार्यवाही नगरपालिका करेल.शिरुर शहरातील सर्व झोपडपट्टी पुर्नवसन करणेकरीता नगरपरिषदे कडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलेला आहे . सदर प्रकल्प अहवाल शासनाच्या मंजुरीसाठी ताबडतोब पाठविण्यात येईल.शिरुर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची कमान बनविणे करीता शिष्टमंडळाचे प्रतिनिधी यांनी नगरपरिषद प्रशासना सोबत जागेची पाहणी करावी त्यानंतर जागेचा प्रस्ताव नगरपरिषद ताबडतोब अंदाजपत्रक तयार करुन मान्यते करीता पाठवून देईल .