शिरूर दिनांक ( वार्ताहर) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिरूर शहरात स्मारक व पुतळा व्हावा या मागणीसाठी पुणे जिल्हा लहूजी शक्ती सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे हे मागील दोन दिवसापासून शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालया समोर उपोषणास बसलेले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दोन दिवस उलटून ही प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने त्याच्या निषेधार्थ व लोखंडे यांच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज व विविध संस्था संघटनाचा वतीने शिरूर नगरपरिषद कार्यालयावर हलगी मोर्चा नेण्यात आला. हलगीचा आवाजाने व घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. या मोर्चात लहूजी शक्ती सेनेचे संजय फाजगे, किरण जाधव, विशाल जोगदंड, माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे , सतीश बागवे यांच्या सह विविध संस्था संघटनाचे कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या वतीने पालिकेस मागण्याचे निवेदन देण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी इशारा देण्यात आला की मातंग समाजाच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. लोखंडे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून ही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला. त्याच बरोबर या प्रश्नी मार्ग न निघाल्यास रास्ता रोकोचा इशारा ही देण्यात आला. दादाभाऊ लोखंडे हे शिरूर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व पुतळा व्हावा या प्रमुख मागणीसह शहरात झोपडपट्टीधारकांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवावा, शहरातील लाटेआळी येथे अण्णाभाऊ साठे स्वागतकमान उभारावी व शिरूर तालुक्यातील सर्व गावात मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधवावे या मागण्यासाठी उपोषणास बसलेले आहेत.