शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत असलेल्या ठिकाणी सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून त्यातून अनेक लहान मोठे गुन्हे घडत असल्याचे दिसून येत असताना सध्या शिक्रापूर येथे अल्पवयीन युवकांकडून एकाची धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडलेली असताना आता या भाईगिरीला आळा बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरुर तालुक्यात युवकांचे अनेक ग्रुप व संघटना सक्रीय असून या ग्रुपच्या युवकांचे अनेक वाड घडत असतात तर कित्येक वाड विकोपाला जाऊन मोठमोठे गुन्हे झालेले तर अनेकदा ग्रुपवार होऊन खुनाच्या घटना देखील घडलेल्या आहेत, सदर ग्रुपच्या युवकांनी त्यांच्या ग्रुपला दिलेली नावे वाहनांवर, अंगावर टाकण्याचे असंख्य प्रकार सुरु असताना सध्या शाळकरी व अल्पवयीन युवकांमध्ये देखील या ग्रुपचे आकर्षण वाढले असताना सोशल मिडीयाच्या माध्यमातून अल्पवयीन मुले या ग्रुपच्या माध्यमातून भाईगिरी कडे वळत आहेत, सध्या शिक्रापुरात अल्पवयीन युवकांकडून एका युवकाचा खून केल्याची घटना घडलेली असताना सणसवाडी येथील एका विद्यालयात अल्पवयीन युवकाने एका युवकाच्या अंगावर ब्लेडने दुखापत केल्याची देखील घटना घडली आहे, तर या भागातील शाळेतील अनेक अल्पवयीन मुले ग्रुप तयार करत असून त्याला वेगवेगळे नाव देऊन आपला वचक आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या युवकांच्या या बाबींना बाहेरून देखील काही युवकांची साथ भेटत आहे मात्र सध्या या युवकांवर आवर न घातल्यास युवक गुन्हेगारीकडे वळण्यास जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच आवर घालणे गरजेचे असून पालकांनी देखील आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाबाजी गोरे यांच्याशी चर्चा केलेली असता शाळेमध्ये झालेल्या वादा संदर्भात दोन्ही मुलांचे पालक शाळेत आलेले होते, त्यांनी वाद मिटवला आहे तसेच शाळेमध्ये मुले ग्रुपचे नाव शरीरावर लिहून अथवा गोंधून काढत असल्याबाबतची शाळेतून चौकशी करुन पुढील निर्णय घेतला जाईल असे प्राचार्य बाबाजी गोरे यांनी सांगितले.
पालकांचे मुलांकडे विशेष लक्ष गरजेचे – सागर दरेकर ( उपसरपंच )
सध्या मुलांकडे मोबाईल आल्याने मुलांकडून अनेक गैरप्रकार घडत आहेत मात्र याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे देखील दिसत आले परंतु पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देऊन मुलांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सणसवाडीचे उपसरपंच सागर दरेकर यांनी सांगितले.
मुलांच्या पालकांना बोलावून घेऊ – हेमंत शेडगे ( पोलीस निरीक्षक )
पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थी असे प्रकार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज देणे तसेच महाविद्यालयांमध्ये मुलांचे समुपदेशन व योग्य मार्गदर्शन केले जाईल असे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.