'आम्ही रत्नागिरीकर' च्या निमित्ताने...

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.

9850863262

        रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील विकास कामांबाबत सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील सुजाण नागरिकांची एक बैठक आयोजित केली होती. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी ' सामंत यांच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही ' असे बजावत ही बैठकच उधळून लावल्याचे वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यानंतर या विषयात माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतल्यामुळे एका नवीन नाट्याची निर्मिती झाली आहे. या विषयाला केवळ विकास हाच एक कंगोरा नाही तर राजकारणाचे अनेक कंगोरे आहेत. 

      कीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रत्नागिरी शहराच्या विकासाच्या तळमळीतून ही बैठक आयोजित केली असेल, त्या हेतूबद्दल ते प्रामाणिक असतील तर त्यांचे कौतुक केले पाहिजे. गेला काही काळ उदय सामंत आणि किरण सामंत कीर यांच्या निशाण्यावर आहेत. डांबर घोटाळा आणि अन्य अनेक विकास कामातील मक्तेदारी, त्यातील भ्रष्टाचार याबाबत कीर सातत्याने बोलत होते. डांबर घोटाळा जयंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला होता. कीर आणि सामंत यांच्यात आग धूमसत होतीच. त्यामुळे सामंत यांच्या समर्थकांनी ही बैठक उधळली असावी. मात्र ते एक विसरले की, यामुळे ते आणि पालकमंत्री उदय सामंत हे आरोपांना, टिकेला, विकासात्मक मुद्यावर उत्तर द्यायला समर्थ नाहीत म्हणून गुद्याची भाषा करावी लागली असा मेसेज रत्नागिरी शहरासह अन्यत्र गेला. एवढी मातब्बर मंडळी एका बैठकीला घाबरली हा संदेश सामंत यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. रत्नागिरी शहरातील रस्ते, पाणी आणि अन्य विकास कामांबाबत सोशल मीडियावर नागरिक हर तर्हेने संताप व्यक्त करत असतात, प्रश्न उपस्थित करत असतात. किरण किंवा उदय सामंत यांच्या कॉमन किंवा वेगवेगळ्या समर्थकांनी कीर यांच्याच बैठकीचा उपयोग करून तेथील नागरिकांना अगदी विरोधकांनाही मुद्देसूद, पुराव्यानिशी उत्तरे दिली असती तर ते ' हिरो ' झाले असते. आता स्पष्ट सांगायचं झालं तर ते ' झिरो ' झालेत. आणि त्यांनी उदय सामंत यांनाही अडचणीत आणले आहे. (उदय सामंत या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ होते असे समजून चाललो तर ) सामंत समर्थकांना बैठक उधळल्याने फार मोठा पराक्रम केला असं वाटत असेल तर तो त्यांचा सर्वात मोठा भ्रम आहे. जसं देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात तसं मतदारांच्या मताचा थांगपत्ता लागू शकत नाही. कारण काही असेल पण लोकसभेला स्वतःच्या मतदारसंघात लीड घेता आले नाही.. किमान बरोबरी राखता आली नाही हा मेसेज दुर्लक्ष करण्यासारखा नाही. ' अंडर करंट ' नावाची चीज सामंत बंधू, त्यांचे समर्थक यांनी दुर्लक्षित करू नये. तसेच मतदारांना गृहितही धरू नये. माणूस मोठा झाला आणि त्यात अहंकार फार वाढला तर नियती त्याला एका फटक्यात शून्यात आणू शकते. हे कोणीच विसरू नये. राजकारणी असोत वा अन्य कोणत्याही क्षेत्रातला. 

       कीर स्वतः नागराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना रत्नागिरी शहराच्या विकासाचे प्रश्न, त्यातील अडचणी, उपाय, दूरदृष्टी, दर्जा अशा विविध अंगानी माहिती असावी. ते केवळ सामंत यांना व्यक्तीगत किंवा राजकीय द्वेषातून टार्गेट करत असतील तर तेही चुकीचे ठरेल. कीर आणि त्यांच्या सहकार्यांना विकासाबद्दल खरोखरच आत्मीयता असेल तर रत्नागिरीतील नागरिक त्यांना नक्की साथ देतील. एक बैठक उधळली म्हणून काही बिघडत नाही. उलट अधिक प्रतिसाद मिळू शकतो यात वाद नाही.

       दुसरा मुद्दा निलेश राणे यांनी घेतलेली भूमिका. विकासात्मक कामासाठीची चर्चा, बैठक उधळली जाऊ नये असे त्यांचे मत आहे. मत म्हणून ते योग्य आहे. पण राणे यांची एंट्री आणि लोकसभा निवडणूक पूर्व, पश्चात चालू असलेली धुसफूस, एकमेकांना इशारे देण्याचे उद्योग चालू आहेत त्याचा संबंध एखाद शेम्बडं पोरच नाकारू शकेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान जे काही झालं त्याचं उट्टे संधी मिळाली रे मिळाली की काढले जात आहे. निलेश राणे हे जेव्हा अशीच एखादी बैठक, चर्चा स्वपक्षाच्या सरकारविरोधी, लोकप्रतिनिधिविरोधी प्रसंगी नेते म्हणून स्वतःच्या बाबतीतही मोकळेपणाने घडवून आणतील तर त्यांची आत्ताची भूमिका अधिक प्रामाणिक वाटेल. राजकीय सोईनुसार जर भूमिका असेल तर त्याला काहीच अर्थ नाही.

     आजकाल गावपुढारी असो वा दिल्लीतला वा आणखी अधला मधला असो तो आपणच जनतेचे तारणहार आहोत, आपल्यासारखा दुसरा कोणी नाहीच, सगळीकडे आपलीच वट आहे अशा अहंकारात, फुकटच्या मोठेपणात वावरत असतो. सत्तेतून संपत्ती.. संपत्तीतून सत्ता, त्यातून एक प्रकारचा माज दिसतो. आणि कार्यकर्ते तर काय विचारू नका.. घरी इकडची काडी तिकडे करणार नाहीत, पण नेत्याच्या घरची धुणी भांडीही करतील. त्याच्या चप्पल, बूट, गॉगल, नॅपकिन अगदी जीवापाड सांभाळतील. गाडीचे दरवाजे उघडतील. आपला नेता म्हणजे कोणी मोठा 'कर्मवीर' च असल्याचा त्यांना साक्षात्कार होतो. तो त्यांचा देव होतो, तारणहार होतो, कार्यसम्राट होतो, भाग्यविधाता होतो. (आणखी काय काय होतं ते त्यांनाच माहिती) सध्याचे राजकारणी खरोखरच प्रामाणिक असते ना तर राज्याची राहू दे.. कोकणाची ही दशा झाली नसती. कंत्राट मिळवणे, कार्यकर्ते सांभाळण्यासाठी कामे 'काढणे', कामं घेतली तर त्याची काशी करणे, बोगस कामं करून किंवा न करताच बिलं काढणे असले उद्योग केल्याशिवाय एखादा पुढारी मोठा झाला असेल तर तो चमत्कारच ठरेल! एखादयाची किती चमचेगिरी करायची याला काहीतरी मर्यादा असावी ना...

    असो. आम्ही रत्नागिरीकर यांच्या बैठकीप्रमाणे गावागावात, शहराशहरात बैठका झाल्या पाहिजेत. विकासावर चर्चा झाली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत, प्रसंगी उपायही सुचवले पाहिजेत. मग सत्ता, सरकार, आमदार, खासदार, मंत्री कोणत्याही पक्षाचा असो. आणि मुख्य म्हणजे प्रशासनाने आपण झेलेगिरी करायला नाही तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत याचे भान ठेवावे.