शिरुर दिनांक ( वार्ताहर) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता शिरुर शहरात विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली आहे . यासंदर्भात शिरूर नगरपरिषद कार्यालय येथे मुख्याधिकारी स्मिता काळे  यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियोजन व आढाव बैठक आयोजित करण्यात आली होती . शिरूर नगरपरिषद हद्दीतील महिलांना सोयीस्कर रीतीने या योजनेचा फॉर्म भरता यावा व जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा या करिता नियोजन करण्यात आलेले आहे. शिरूर शहरातील सर्व १० अंगणवाडी शाळेमध्ये प्रतेकी एक अंगणवाडी सेविका व शिरूर शहरातील बचत गटांतील २ महिला सदस्य यांच्या मार्फत ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे शिरूर शहरातील वस्ती स्तर संघ व शहर स्तर संघातील महिला पदाधिकारी, सदस्य यांच्या मार्फत देखील फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार योजनेच्या पात्रता व अपात्रता या सर्व बाबींचे विश्लेषण मुख्याधिकारी काळेयांनी केले. तसेच अंगणवाडी सेविका सुपरवायझर श्रीमती. मिलन गिते यांनी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया व त्यात येणाऱ्या अडचणी यांबाबत माहिती दिली. शिरूर शहरातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता शिरूर नगरपरिषदे तर्फे आवश्यक सर्व सुविधा पुरवण्यात येतील असेही काळे यांनी सांगितले . या बैठकीला शिरूर नगरपरिषदेचे प्राशसकीय अधिकारी श्री. राहुल पिसाळ, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे , शहर समन्वयक कु. प्राची वाखारे. एनयुएलएम विभागाचे मिठू गावडे तसेच सर्व वस्ती स्तर संघाच्या महिला पदाधिकारी शहर स्तर संघाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. शिरूर शहरातील सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन काळे यांनी केले आहे. सदर नोंदणी करणेसाठी 1. आधार कार्ड. 2. अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/ 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड / 15 वर्षापूवीचे मतदार ओळखपत्र (यापैकी कोणतेही एक), 3. उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, 4. अर्जदाराचे हमीपत्र, 5. बँक पासबुक, 6. अर्जदाराचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.