शिरुर दिनांक (वार्ताहर ) शिरुर शहरातील वाहतूक व रहदारी कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याचा दृष्टीने शहरातील रस्त्यांवर सम विषम पार्किंग राबविण्यात येईल असे पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . गुंजवटे म्हणाले की पार्किंगच्या जागे संदर्भात नगरपरिषदेशी चर्चा करण्यात येईल . शहरातील कॉलेज रोड , विद्याधाम प्रशाला कॉर्नर ते पाबळ फाटा रस्त्यावरील रहदारी व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सम विषम पार्किंग करण्याबाबत कायदेशीर बाबीची पूर्तता करुन निर्णय घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला . शहरातील ज्या शाळांच्या समोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी व गर्दी होती त्या संदर्भात संबंधित शाळांना पत्र देण्यात येणार आहे .त्याच बरोबर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या शालेय बसेसची तपासणी करुन त्या वाहतुकी करीता सुस्थितीत आहे की नाही याची ही तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .शाळा कॉलेज करीता निर्भया पथक सुरु करण्यात येईल असे त्यांनी सांगितले . ड्रीक ॲन्ड ड्राईव्ह संदर्भात दारु पिउन वाहन चालविणा- या वाहनचालकांचा विरोधात कारवाई करण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे त्याठिकाणच्या अपघातांच्या कारणांचा अभ्यास करुन अपघात होवू नये म्हणून उपाययोजना करण्यात येणार आहे. उपाययोजनाचा भाग म्हणून स्पीड ब्रेकर ही रस्त्यावर टाकण्यात येणार असल्याचे गुंजवटे म्हणाले शहरातील विविध कॅफे मधून चूकीचे काही होणार नाही या दृष्टीने कारवाई करण्यात येईल . पोलिसिंग व्यवस्थित करुन लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे गुंजवटे म्हणाले .