खुल्या कारागृहात कैद्यांसाठी 'जीवन गाणे गातच जावे' उपक्रम
गडचिरोली, ता. १२ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यातील ३६ प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला आहे. याच उपक्रमाअंतर्गत शुक्रवार स्थानिक खुल्या कारागृहात कैद्यांसाठी ‘जीवन गाणे गातच जावे' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. या महोत्सवात अनेक अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यापैकीच एक कार्यक्रम म्हणजे राज्यातील प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, समुपदेशनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे होय. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत या कार्यक्रमासाठी एकूण ३६ कलासमूह निवडण्यात आले होते. एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले होते. या कार्यक्रमात १००० पेक्षा जास्त कलाकारांनी भाग घेतला. बहुतांश कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक, न्यायाधीश उपस्थित होते. कारागृहातील कैद्यांसाठी संपन्न झालेल्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते. गडचिरोली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कारागृह अधीक्षक निमगडे होते. प्रमुख प्रबोधनपर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य कार्यवाह विलास निंबोरकर, तुरुंग अधिकारी कोकाटे, पत्रकार मिलिंद उमरे, पतंजली योग समितीचे मोडक आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विलास निंबोकर यांनी देश व समाजातील समस्यांच्या निवारणासंदर्भात मार्गदर्शन करताना वैयक्तिक उन्नतीसह देशाच्या प्रगतीत योगदान देण्याबद्दल कैद्यांचे समुपदेशन केले. पतंजली योग समितीचे मोडक यांनी योगविषयक माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर शाहीर प्रा. प्रवीण जाधव यांनी आपल्या पहाडी आवाजात अनेक देशभक्तीपर गीतांचे गायन केले. त्यांना ढोलकी वादक जगन्नाथ पाखरे, कोरस विकास जाधव यांनी सहकार्य केले. तसेच कैद्यांसाठी प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. या चमूमध्ये संजय मेकर्तीवार, शरीफ मानकर, आशीष गुरनुले, अविनाश कतले, चंद्रमणी रायपूरे, मनेश तोडासे, गायत्री चौधरी, पायल मांदाडे यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक खुशाल ठाकरे होते. तसेच संचालन चंचल रोहनकर यांनी केले.
मिळाली नवी ऊर्जा...
जाणते, अजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी कार्यक्रमात स्पष्ट केले. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळालेली असून भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी आशाही अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक ‘जीवन गाणे गातच जावे...‘ अतिशय सार्थ आहे. त्यामुळे एक नवी ऊर्जा मिळाली असून जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.