शिरुर दिनांक ( वार्ताहर ) पुणे - शिरुर राज्य महामार्गावरील कारेगाव ते शिरुर बायपास रस्त्यावरील चुकीच्या पद्धतीने बसवलेल्या स्पीडबेकर मुळे सातत्याने गंभीर अपघात होऊन जिवितहानी होत असल्याने स्पिडबेकर तपासणी करुन चुकीचे स्पीडबेकर हटविण्याबाबत उपाय योजना करावी व दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन खात्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी भाजपा उद्योग आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या कडे केली आहे . पाचंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुणे - शिरुर महामार्गावरील शिक्रापूर ते शिरुर हा रस्ता मुत्यु चा सापळा बनला आहे. या रस्त्यावरील टोल सन २०१० साली टोल बंद झाला. त्यानंतर अपवादाने किरकोळ दुरुस्ती करण्यापलीकडे जवळपास १४ वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिला आहे. त्यातच कोणत्याही तज्ञांची मदत न घेता या भागात ठिकठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पिडबेकर बसविण्यात आले आहेत . चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी हे स्पिडबेकर बसविल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर अपघात होत असुन त्यात वाहनांचे नुकसान तर होतच आहे पण निरपराध नागरिकांचे या अपघातात बळी जात आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. जेवढे अपघात झाले आहेत व निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत यास पुर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा, कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणाचे फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे . १५ दिवसात पुणे शिरुर रस्त्यावरील स्पिडबेकर चे ऑडीट करुन तज्ञांची मदत घेऊन चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आलेले स्पिडबेकर हटविण्यात यावेत. तसेच याबाबत एक बैठक आयोजित करण्यात यावी. तसेच रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी ठोस व अचुक उपाययोजना करावी. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधचा गुन्हा दाखल करुन खात्यांतर्गत कारवाई करावी. अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही तर नाईलाजाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असा इशाराही पाचंगे यांनी दिला आहे .