रत्नागिरी/ प्रतिनिधी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. मारूती काका जोशी यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर हे रत्नागिरी जिल्ह्यात येत असून बुधवारी (दि.१ मे) रोजी रत्नागिरी शहरातील स्वा. सावकर मैदान, लक्ष्मी चौक, गाडीतळ येथे जाहीर सभा होणार आहे तरी सभेस मतदार संघातील मतदार बंधूनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका महासचिव मुकुंद सावंत यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत रणधुमाळी सुरू असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मारूती काका जोशी यांचा प्रचार देखील वेगात सुरू आहे. या मतदासंघातील लढत ही रंगदार होणार आहे. महायुतीकडून नारायण राणे, महाविकास आघाडीकडून विनायक राऊत तर वंचित बहुजन आघाडीने देखील पुन्हा एकदा मारूती काका जोशी यांना रिंगणात उतरवल्याने राणे, राऊत यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. 

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातील निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या सभांचा आता धडाका सुरू झाला आहे. राज्यातील लोकसभेच्या जाहीर केलेल्या आपल्या उमेदवारांसाठी आंबेडकर प्रचारात उतरलेले पाहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत मारूती काका जोशी यांच्या प्रचारार्थ उद्या १ मे रोजी सकाळी दहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करनार आहेत. मात्र यावेळी ते कोकणातील अनेक विषयांवर भाष्य करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रिफायनरी विरोधी आंदोलकांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांनी विनाशकारी प्रकल्प कोकणात लादू नये अशी ठाम भूमिका यापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर या सभेत नेमका कोणावर निशाणा साधणार हे पाहणे उस्तुक्तेचे ठरणार आहे.