नांदेड:- (दीपक परेराव) मागील काही दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला, यात नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे नद्या, ओढे यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले, याची तातडीने दखल घेऊन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी नांदेड जिल्ह्यातील निळा गावास भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या भागातील शेतकऱ्यांशी संवादा दरम्यान रंगनाथराव कदम यांनी मुसळधार पाऊस व पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण पिकाची नासाडी झाली असून खत, बियाणेसाठी केलेला खर्च वाया गेला शिवाय जमीन खरडून गेल्यामुळे या हंगामात पीक ही लागवड करता येणार नाही, हाता तोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्ती मुळे हिरावला गेला. सरकारने ही थोडीशी मदत केली, अशा व्यथा मांडल्या.
यावेळी विरोधी पक्षनेता आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना धीर देण्याची आवश्यकता असताना तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. याविषयी तातडीने सभागृहात आवाज उठवून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
यावेळी परिसरातील शेतकरी बांधव, जिल्हाप्रमुख दत्तासाहेब कोकाटे ,संपर्कप्रमुख धोंडु पाटिल निळ, माजी आमदार रोहिदास चव्हाण , संभाजीनगर पुर्व विधानसभा संघटक राजू वैद्य ,बाळासाहेब देशमुख, बाबासाहेब निळेकर, नवनाथ जोगदड, सुनिल कदम आदी उपस्थित होते.