रत्नागिरी
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीमुळे रत्नागिरी शहरातील मुख्य मार्गावरील एक बाजू बंद करण्यात आली होती तसेच वाहतूक काही ठिकाणी एकदिशा तर काही ठिकाणी पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली होती; मात्र या नियोजनाचा बोजवारा उडाला. दुपारी बारा ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार पाहायला मिळाला. या कालावधीत वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांना कसरत करावी लागली. अडीचनंतर गर्दी ओसरली आणि वाहतूक सुरळीत झाली. त्यामुळे रणरणत्या उन्हात सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. अखरेचा दिवस असल्यामुळे महायुतीचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाठीराखे लहान-मोठी शेकडो वाहने घेऊन रत्नागिरी शहरात दाखल झाले होते. आधीच शहरातील विविध रस्त्यांवर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
सीएनजी गॅससाठी ठिकठिकाणी खोदलेले रस्ते, अचानक शहरात वाहनांची गर्दी झाल्याने शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. शहराबाहेरून आलेली असंख्य वाहने आणि त्यातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी यामुळे रत्नागिरी शहरातील वाहतुकीवरील अचानक ताण वाढला. दुपारी बारा-साडेबारा वाजल्यापासून पुढे दोन ते अडीच वाजेपर्यंत कडक ऊन असताना वाहतूककोंडीत अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
या वाहतूक कोंडीचा फटका विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसेस, रिक्षा यांच्यासह रुग्णवाहिकांनाही बसला. काही ठिकाणी वाहतूककोंडीमध्ये वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांच्या व्हॅनही अडकलेल्या होत्या. दुपारी तीन ते साडेतीननंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली; मात्र वाहनधारकांसह सर्वसामान्यांचे या वाहतूककोंडीत प्रचंड हाल झाले.