( रत्नागिरी )

राष्ट्र निर्माते महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकले सावरलेल्या उच्चभ्रू, उच्च शिक्षित समाजाला समजायला, समजून घ्यायला जड जाते. तिथे जिल्हा अहमदनगर, तालुका अकोलेतील कोकण वाडी वस्तीवरील आदिवासी समाज त्यांना समजून घ्यायला लागला आहे. यातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन घडत असल्याचे पहायला मिळत आहे.

जिथे पार्लेचा बिस्कीट पुडा मिळवण्यासाठी तालुका गाठावा लागतो.अशा कोकणवाडी या दुर्गम, दुर्लक्षित भागातील आदिवासी बांधव सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाने भारुन आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी कार्याने प्रेरित होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती साजरी करीत आहेत ही बाब म्हणजे तुम्ही कितीही आंबेडकर नाकारले तरीही ते सुर्या सारखे क्षितीजावर येतंच राहणार आणि वंचित समुहाच्या जिवनात प्रकाश पेरीत राहणार हे निश्चित.

 जिल्हा अहमदनगर, तालुका अकोलेतील कोकण वाडी वस्तीवरील महादेव कोळी समाजातील एक तरुण नवल चौरे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सहवासात येतो . आणि या सहवासात त्याला आंबेडकर विचारधारा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर गवसतात.आणि त्याच्या जिवनाला कलाटणी मिळते. कधीही त्याच्या वाडी वस्तीवर साजरी न झालेली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा विचार तो त्याच्या समाजातील तरुण बांधवा समोर ठेवतो .आणि आज आपण आदिवासी समाज आपल्या हक्क अधिकार जे उपभोगत आहोत ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना मुळेच.आणि म्हणूनचं जयंतीनिमित्त संविधान जनजागृती करण्यासाठी आदिवासी समाजातील अभ्यासक आद.संतोष पोपरे हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे बहुजन समाजा साठीचे अतुलनीय कार्य आणि भारतीय संविधान या विषयावर प्रबोधन करणार आहेत. तर आदिवासी समाजातील पद्मश्री बिजमाता राहिबाई पोपरे आणि अनेक मान्यवर हे संबोधित करणार आहेत.त्याच प्रमाणे दिनांक १४ एप्रिल रोजी " बुद्ध धम्म आणि आदिवासी धर्मातील साम्य " या विषयावर मान अनिल जी जाधव रत्नागिरी हे मार्गदर्शन करणार आहेत.तर पुणे भिमाशंकरचे अमोल थोरात हे पंचशिल आणि संविधानातील मार्गदर्शक तत्वे या विषयावर संबंधितांना मार्गदर्शन करतील.

दिनांक १३ आणि १४ एप्रिल असे दोन दिवस जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी समाजातील तरुण पिढीने खेळाकडे करिअरच्या दृष्टीने बघणे जरूरी आहे म्हणून विविध क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले असून या विषयावर बोलण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक संजय गमरे माणगाव -रायगड ( मार्शल आर्ट) हे उपस्थित राहणार आहेत. वंचित समाज वर्तमान काळात जागृत होतो आहे.आणि आपल्या न्याय हक्कांच्या खडतर प्रवासात दिप स्तंभ म्हणून तो आंबेडकरांना शोधतोय हेच यातून अधोरेखित होतं असताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक जयंती कशी साजरी करावी हे आदिवासी समाज यातून दर्शवीत आहे.