संशयितांवर अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करुन त्वरित अटक करा 

लांजा बौद्ध समाजाच्या वतीने पोलिसांना निवेदन 

[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]

लांजा तालुक्यात साटवली बौध्दवाडीतील वृद्धाला झुंडीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगोपन करण्याकरीता संदीप जाधव हे खरेदी केलेली गुरे आणण्यासाठी गेले होते. रस्त्यामध्ये दबा धरुन बसलेले भैरुलाल भंडारी, (रा.लांजा) व त्यांचे सहकारी अभिषेक सुरेश तेंडूलकर, (रा.हर्चे) यांच्यासह सहा ते आठ जणांच्या लुटारु टोळी पूर्वनियोजित कट रचून संदीप जाधव यांच्यासह वाहनचालक, गाईंचे मालक यांनाही लाकडी काठीने, दगडांसह लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच रात्रभर डांबून ठेवून त्यांच्याकडून रक्कम उकळण्याचा प्रयत्नहि मारहाण करणाऱ्या तिघांनी केल्याचे समोर आले आहे. हा सर्व २३ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडला असून संशयित आरोपींवर गुन्हे नोंदवून अँट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करुन त्वरित अटक करण्याची मागणी मंगळवारी २७ फेब्रुवारी २०४ रोजी निवेदनाद्वारे तालुका बौध्द समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे साटवली येथील बौध्द समाजाचा बांधव श्री. संदिप राजाराम जाधव, रा.साटवली बौध्दवाडी यांनी मौजे हर्चे येथील श्री. विठठल बाबू शिरसेकर यांच्याकडून स्वतः संगोपन करण्याकरीता गायी खरेदी केल्या. सदर गायी साटवली बौध्दवाडी येथे आणण्याकरीता साटवली येथील स्थानिक श्री. अजय नारायण तरळ यांचे वाहन घेऊन दि. २३/०१/२०२४ रोजी दुपारी हर्चे येथे गेले. व ठरलेली रक्कम देऊन गायी आणणेकरीता गेल्यावर गायी रानात दुरवर चरण्यासाठी गेल्याने त्यांना शोधेपर्यंत काळोख झाला. त्यामुळे गायी वाहनामध्ये भरणे व ठरलेली रक्कम देणे आणि खेडयांमधील पंरपरेनुसार चहापान आणि जेवण घेईपर्यंत रात्र झाली व पुढील प्रवासाला सुरुवात झाली.

सहा ते आठ जणांच्या जमावाने केली बेदम मारहाण 

त्यानंतर हर्चे बेनी फाटयाच्या दरम्यान रस्त्यावर दगडी ठेवण्यात आलेल्या आढळल्या. त्या दगडी बाजूला करण्यासाठी वाहन थांबविले व श्री. संदिप जाधव हे गाडीतून उतरुन दगडी बाजूला करीत असताना पुर्व नियोजित जिवे मारण्याच्या उद्देशाने बाजूला दबा धरुन बसलेले श्री. भैरुलाल भंडारी, रा. लांजा व त्यांचे सहकारी श्री. अभिषेक सुरेश तेंडूलकर, रा.हर्षे व सहकारी मिळून सहा ते आठ जणांच्या जमावाने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याची चर्चा देखील सुरू आहे. 

श्री. संदिप राजाराम जाधव यांनी नाव व पत्ता सांगून मी साटवली बौध्दवाडीचा रहिवाशी आहे, असे सांगितले. मला मारु नका मी हात जोडतो तुमच्या पाया पडतो असे सांगूनही जिवे मारण्याच्या उद्देशाने आळीपाळीने काठी, दगड व लोखंडी रॉडने मारहाण केली. व तु बौध्द म्हणजे महार आहेस तुझे महार आमचे काय करतात ते आम्ही बघतो असे म्हणून त्यांची मारहाण चालूच होती. त्यांच्याबरोबर वाहन चालक श्री. अजय तरळ यांनाही मारहाण केली. सदर प्रकार रात्रभर चालू होता शेवटी गायींचा मालक श्री. शिरसेकर यांना बोलावण्यात आले. ते आल्यावर त्यांनाही मारहाण केली. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना दमदाटी

तसेच मारहाण करणाऱ्या झुंडीने श्री. शिरसेकर यांच्याकडे ५०,०००/-(पन्नास हजार) रुपये व श्री. संदिप जाधव यांच्याकडे १००००० (एक लाखाची) थी. भेरुलाले भंडारी अभिषेक तेंडूलकर आणि जमावाने रक्कमेची मागणी केली. परंतु रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर दि. २४/०१/२०१४ रोजी सकाळी मारहाणीत जखमी झालेल्या तिघांना लांजा पोलिस ठाणे येथे आणून श्री मोरे (बीट अमंलदार ) यांनी मारहाण करणाऱ्यांच्या सांगण्यानुसार श्री. संदीप जाधव, श्री.शिरसेकर व श्री.अजय तरळ या तिघांवर गुन्हा दाखल केला, तरी या तिघांनीही त्यांना झालेली मारहाण मोरें यांना दाखवून आमचीही तक्रार घ्या अशी विनवणी केली. परंतु मोरे यांनी उलट त्या तिघा जखमींना दमदाटी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

बीट अंमलदार मोरेंवर प्रशासन कारवाई करणार ?

‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु या वाक्याचा बीट अंमलदार मोरे यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. अशा नगण्य घटनांमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असून जिल्हा पोलीस प्रशासन बीट अंमलदार मोरेंवर कोणती कारवाई करणार ? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जातीय तेढ निर्माण करण्याचा कट 

या सर्व प्रकारामध्ये श्री भैरुलाल भंडारी, रा. लांजा व त्यांचे सहकारी श्री. अभिषेक सुरेश तेंडूलकर, रा.हर्चे यांची लुटारु टोळी पूर्वनियोजित कट करुन हा अमानुष मारहाणीचा प्रकार व रक्कम उकळणे करीता हा प्रकार केलेला आहे. तसेच बौध्द समाजाचा अपमान करुन श्री. संदिप राजाराम जाधव, रा. साटवली बौध्दवाडी यांना जातीवाचक महार हा शब्द उच्चारुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याचा कट जातीय तेढ निर्माण करण्याचा कट केलेला आहे. असेही निवेदनात म्हटले आहे.

बौद्ध समाज आक्रमक, जिल्ह्यात पडसाद उमटण्याची शक्यता 

दरम्यान मारहाणीत जखमी तिघेही वैद्यकीय उपचारांकरीता सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी दाखल झाले. रुग्णालयात उपचार घेऊन आजपर्यंत त्यांनी आम्हाला दिलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे त्यांच्या दहशतीखाली असल्याचे जखमींनी बैठकीत सांगितले आहे. तसेच घडलेल्या धक्कादायक प्रकाराची सर्व माहिती लांजा तालुक्यातील बौध्द समाजाच्या आयोजित बैठकीत श्री. संदिप जाधव, श्री. शिरसेकर व श्री तरळ यांनी बौध्द समाजापुढे सोमवारी दि.२७/०२/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिली. या घटनेची माहिती सर्व जिल्हाभर पसरल्याने बौद्ध समाज चांगलाच आक्रमक झाला असून संतापजनक प्रकाराबाबत विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होताना दिसत आहे. तसेच पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असून जिल्ह्यात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.या प्रकरणातील मारहाण करणारे भैरुलाल भंडारी, अभिषेक सुरेश तेंडूलकर, व सहकारी यांच्यावर गुन्हे नोंदवून ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवून अटक करुन कायदेशिर कारवाई त्वरीत करावी अशी सर्व तालुका बौध्द समाजाची मागणी आहे. तसेच या विषयात कोणच्याही दबावाला न जुमानता कायद्याने कारवाई करावी असेही शेवटला निवेदनात म्हटले आहे.

उच्च स्तरीय चौकशी करा

हा फुले शाहु आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. अशा घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत असतील तर ही लाजिरवाणा बाब आहे. याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. असा अविवेकपना खपवून घेतला जाणार नाही. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे सरचिटणीस सुधाकर कांबळे यांनी केली आहे.

________________

झुंडगिरी, गुंडगिरी चालणार नाही. "अरेला का रे" करण्याची धमक ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आहे. या मारहाण घटनेतील गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना वाचविण्याचे प्रयत्न कोणीही करेल तर गाठ बौद्ध समाजाशी असेल. तसेच नराधमांवर ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवून तातडीने अटक करावी अन्यथा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर घटनेचा उद्रेक होईल

-अनिरुद्ध कांबळे ( काँग्रेसचे कार्याध्यक्ष व संगमेश्वर चिपळूण विधानसभा निरीक्षक)