शिरुर दिनांक ( वार्ताहर ) मराठी भाषेचा  गौरव म्हणजे आपल्या 'स्व'सामर्थ्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख व साहित्यीक डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी केले .

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सिताबाई थिटे फार्मसी कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते . ते म्हणाले   "प्रत्येकाने आत्मसन्मानार्थ 'स्व' भाषेविषयी सदैव अभिमान बाळगणे आवश्यक आहे. कारण भाषा व्यक्तीला विचार करायला लावते.भावना व कल्पना प्रकटीकरणासाठी भाषेला पर्याय नाही. म्हणूनन लेखनासाठी संत,पंडितीकवी,शाहिरांनी परकीय आक्रमणे होत असताना लेखनासाठी मातृभाषा मराठीचा आग्रह धरला. ज्ञानदेव माऊलींनी 'माझ्या मराठीची बोलू कौतुके ' असे म्हणताना अमृताशी पैज लावली. कीर्तन करताना भावकाव्यातून नामदेवरायांनी 'ज्ञानाचा दीप' पंढरपूर पासून पंजाब - घुमान पर्यत मराठीतून तेवत ठेवला. पैठणच्या नाथमहाराजांनी भावार्थ रामायणाबरोबर लोकभाषेत लोकांना समजतील अशी भारूडे लिहिली. जगत्-गुरू संत तुकाराम यांनी तर गाथेतून मराठी माणसाला यशस्वी लौकिक जीवनातील रहस्ये शिकवली. 'प्रयत्नवादाचा उद्-घोष करत चळवळीच्या सामर्थ्याचे महत्त्व समर्थानी या भूमीत रूजवले. विविध पंथ,भक्तीमार्ग यांच्या शिकवणी माय मराठीतून व्यक्त झाला नि मराठा तितुका मेळवून महाराष्ट्र धर्म वाढला." डॉ. लळीत पुढे म्हणाले, "संत,पंत आणि शाहिरांनी निर्माण केलेली मराठी वाङ्मय परंपरा नव्या पिढीपर्यन्त पोचवणे व जीवन समृद्ध करणे यासाठी मायमराठीचा गौरव नित्यनेमाने विविध उपक्रमाद्वारे केला पाहिजे . !".असे तळमळीचे उद्गगार या प्रसंगी डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी काढले. शिरुर येथील सीताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयात झालेल्या या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती होते. प्रा. निशिकांत शिंदे यांनी डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्या मराठी भाषा व साहित्य विषयक कार्याचा परिचय करून दिला. लेखन,पीएच.डी.मार्गदर्शक म्हणून केलेल्या कार्यानिमित्त या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून प्राचार्य डॉ. बाहेती  यांच्या हस्ते  डॉ. बाळकृष्ण लळीत सर यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सुत्र संचालन  क्षितिजा खरात हिने केले तर आभार  सौरभ मोरे याने मानले. औषधनिर्माण शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. लळीत यांनी  दुर्मिळ मराठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले त्यास ही विद्यार्थ्यानी उस्फूर्त प्रतिसाद दिला .