वैजापूर 

______________________________

पोलिसांनी शहरातील स्टेशन रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख दोन हजार ५८० रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास स्टेशन रस्त्यावर लक्ष्मी टी हाऊस या हॉटेलसमोर करण्यात आली. या ठिकाणी शहरातील परदेशी गल्ली भागात राहणारा संदिप हरचंद राजपूत हा लोकांकडुन पैसे घेऊन कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, पोलीस अंमलदार राम राठोड यांच्या पथकाने पंचांना घेऊन छापा टाकला असता त्यावेळी संदिप राजपूत हा अन्य सात लोकांना पैसे घेऊन जुगाराच्या चिठ्ठ्या देतांना आढळुन आला. पोलिसांनी सर्वांची अंगझडती घेतली असता त्यात जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आढळुन आली.‌ संदिप राजपूत (रा.परदेशी गल्ली), ज्ञानेश्वर बागुल (मोंढा मार्केट), सुरेश पवार, लक्ष्मण गांगुर्डे, सज्जन बागुल, बद्रिनाथ सोनवणे, सर्व रा. लोणी व बाळु पवार रा.‌बिलवणी अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राम राठोड यांच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.