अमृत महोत्सवी नृत्य स्पर्धेत” नवी मुंबईतील कलावंतांनी घडविले देशाभिमान व भारतीय संस्कृतीचे विलोभनीय दर्शन*

 प्रतिनिधी;

   विविध कला या स्वत:ला प्रकट करण्याचे माध्यम असून नवी मुंबई महानगरपालिकेने नृत्य कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेला नृत्य स्पर्धेसारखा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त करीत सुप्रसिध्द अभिनेत्री व नृत्यांगना श्रीम. शर्वरी जमेनीस यांनी देशभक्तीपर भावना विविध प्रकारे अभिव्यक्त करणा-या नृत्य रचना पेश केल्याबद्दल कलावंतांचे व नृत्य समुहांचे कौतुक केले.

    भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक विभागाने अमृत महोत्सवी गायन, एकपात्री अभिनय तसेच नृत्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामधील अमृत नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी अंतिम फेरीच्या परीक्षक म्हणून श्रीम. शर्वरी जमेनीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उप आयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, उप आयुक्त श्री. मनोजकुमार महाले व डॉ. श्रीराम पवार, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, प्राथमिक फेरीचे परीक्षक नृत्य दिग्दर्शक श्री. सचिन पाटील, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

    अमृत नृत्य स्पर्धेत 144 इतक्या मोठ्या संख्येने व्यक्तीगत व समुह नृत्यांमध्ये प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. वैयक्तिक नृत्यात लहान गटात 48 व खुल्या गटात 61 तसेच समुह नृत्यात लहान गटात 16 व खुल्या गटात 19 प्रवेशिका प्राप्त झाल्या. या 144 सादरीकरणाचे प्राथमिक परीक्षण सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शक श्री. सचिन पाटील यांनी केले व त्यामधील 34 कलावंत आणि समुहांची अंतिम फेरीसाठी निवड केली.

     अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिध्द अभिनेत्री आणि नृत्यांगना श्रीम. शर्वरी जमेनीस यांनी केले. लहान गटात कुशल महाजन तसेच खुल्या गटात जयेश बंटुमल्ली हे वैयक्तिक नृत्य प्रकारात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. समुह नृत्यात लहान गटात सुरज डान्स ॲकेडमी आणि मोठ्या गटात एसडीए स्कॉड सिनियर ग्रुप यांनी प्रथम क्रमांकाच्या विजेतेपदाचा बहुमान पटकाविला. प्रत्येक गटात प्रथम तीन आणि 2 उत्तेजनार्थ अशी 5 पारितोषिके प्रदान करण्यात आली.