पाटोदा (गणेश शेवाळे) अतिवृष्टी ग्रस्तांना शासनाने मदत जाहीर केलेली असून अतिवृष्टीने जसे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच बीड जिल्ह्यातील काही भागात शंखगोगलगाईने खरीप पिकाचे नुकसान केले. काही शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केल्याबरोबर सतत पडणाऱ्या पावसाने दुबार पेरणीची वेळ आली, काही शेतकऱ्यांचे खरीप पेरणीचे बी उगवले परंतु सततच्या पावसाने पिकाच्या कोवळ्या वयात जास्त पाणी झाल्यामुळे खरीपाचे कापुस, सोयाबीन, तुर आणि इतर पिके वाया गेली आहे.

    तसेच गेल्या चाळीस दिवसापासून एक दोन दिवस वगळता सुर्यदर्शन नसल्यामुळे पिकाचे नुकसान झालेेेले असुन शेतात गवत जास्त आणि पिक कमी झाले, पिकावर रोगराई अवाक्या बाहेर गेली आहे अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने सरसकट हेक्टरी १३६००/- रुपये मदत करावी. अशा प्रकारचे लेखी निवेदन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा ता.पाटोदा जि.बीड यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.