रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे गेल्या अनेक वर्ष काम सुरू आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत. अशातच महामार्गावरील पाली नजिक उभी काळी धोंड येथील वळणावर बुधवारी ( दिनांक ३१/०१२०२३)रात्री आठच्या सुमारास टँकर चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक अमोल अशोक पवार ( वय ३५ राहणार, साळवी स्टॉप) हा जागीच ठार झाला असून एक जखमी झाला आहे. 

अमोल पवार हे सांगली ते रत्नागिरी असा दुचाकीवरून ( MH 08 Y 4912 ) प्रवास करत होते. त्यांच्यासोबत प्रेम संजय पवार (वय १९ रा.साळवी स्टॉप) दुचाकीच्या मागे बसलेला होता. याच महामार्गावरून टँकर (क्रमांक MH 43 CE 0505) चालक हातखंब्याच्या दिशेने प्रवास करत होता. पाली पासून काही अंतरावर उभी धोंड हे देवस्थान आहे. या वळनावर दोन्ही वाहने आली असता टँकर चालकाने अमोल पवार यांच्या दुचाकीला ओवरटेक करण्याच्या नादात दुचाकीला मागून धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दुचाकी चालक अमोल पवार हे टँकरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले. दुचाकीवर मागे बसलेला प्रेम पवार हा तरुण तिथेच जखमी अवस्थेत पडला होता. मोठा अपघात झाल्याचे समजताच टँकरचालकाने तिथूनच पलायन केले. 

अपघाताची माहिती मिळताच तातडीने श्री नरेंद्र महाराज नाणीज धामची रुग्णवाहिका घेऊन चालक धनेश केतकर यांच्यासह हातखंबा वाहतूक केंद्राचे ए एस आय जाधव पवार , हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल वरवडकर, हेड कॉन्स्टेबल संसारे आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून मृतदेह रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी महामार्गावरील एका मर्गाकिने वाहतूक सुरळीत केली. 

हातखंबा ते पाली महामार्ग धोकादायकच

हातखंबा ते पाली महामार्ग धोकादायक स्थितीत असल्याने या भागात अनेक अपघात होतात. यापूर्वी देखील अनेक अपघात होऊन ठार, किरकोळ, गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई गोवा चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम संत गतीने सुरू आहे. पाली ते हातखंबा भागामध्ये कापडगावपासून केवळ एका बाजूची तुकड्या तुकड्यांमध्ये लेन सुरू आहेत. धोकादायक स्थितीत असणाऱ्या महामार्गाची रखडकथा पाचवीला पुजली आहे. या भागात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  मतदार संघातील रस्त्याकडे आता आमदार उदय सामंत यांचे ही दुर्लक्ष्य होताना दिसून येत आहे. 

महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनचालकांची अपघातातून सुटका नाही असे चित्र निर्माण झाले आहे. चौपदरीकरणाच्या कामाला गती येणार तरी कधी? आणखी किती काळ महामार्गाचा होत असलेला त्रास लोकांनी सोसावा हे आता मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी जाहीर करावे अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मुकुंद सावंत यांनी दिली आहे.