रत्नागिरी : जे भारतीय जनता पक्षासोबत गेले नाहीत त्यांच्यावरच कारवाया होत आहेत. याचा अर्थ या कारवाया सुडबुध्दीने होत आहे. शिंदे गटात गेलेल्यांवर आरोप नव्हते? त्यांच्या चौकशा सुरू नव्हत्या? मग त्यांचे काय झाले? राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून जे भाजप सोबत गेले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नव्हते काय? असा सणसणीत सवाल शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. जनता हा अत्याचार, अन्याय उघड्या डोळ्याने पहात आहे. जनता लोकशाहीच्या मार्गाने अत्याचाराला उत्तर देईल असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला.

भास्कर जाधव यांनी रविवारी सकाळी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी सडेतोड भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी आज माझं वेगळं मत मांडणार आहे. इतकी वर्ष आम्ही काँग्रेसला दोष देत राहिलो. काँग्रेसची राजवट उलथवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. या सर्व गोष्टीचा आम्हाला आता पश्चाताप होतोय. काँग्रेसच्या राजवटीत कुठल्याही विरोधीपक्षाच्या इतक्या छोट्या छोट्या लोकांना त्रास दिला जीत नव्हता.

ज्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वाढवलं त्याच भारतीय जनता पक्षाने केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर आम्हा शिवसैनिकांना त्रास द्यायला सुरूवात केली. आमचे सहकारी आमदार राजन साळवी, रवींद्र वायकर, वैभव नाईक, नितीन देशमुख, खासदार संजय राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण यांना छळण्याचे काम केले आहे. याचंच दुःख होतं की याच करता आम्ही रक्ताचं शिंपण घालून भाजपचा वटवृक्ष वाढवला, असा खेद शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, आज एका म्हणीची आठवण होते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. हे राजन साळवी आणि त्यांचे बंधू हे काय राजकारणानेच मोठे झाले. त्यांनी काही व्यवसाय केला नाही. असा कोणता नियम किंवा कायदा आहे का? की राजकारण्यांनी स्वत:चे कुटूंब सुस्थितीत ठेऊ नये, व्यवसाय करू नये असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. यावेळी उपनेते आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली

बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तेव्हा जबाबदारी घ्यायला हे पक्ष पुढे येत नव्हते. तेव्हा हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. अनेक शिवसैनिक त्यावेळच्या आठवणी सांगतात. त्यांच्याकडे कात्रणं आहेत. ह्यांच्याकडे काय आहे? आजकाल कुणीही फोटो मॉर्फ करून लावू शकतो असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लावताना तेव्हा त्यांचे वय काय होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

श्रीराम सर्वांचा आहे

श्रीराम सर्वांचा आहे.कुणा एका पक्षाचा नाही. आज अयोद्धेत श्रीराम मंदिर होतेय ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होत आहे. त्याचा कुणीही राजकारणासाठी किंवा मतपेटीवर डोळा ठेवून वापर करू नये असा जळजळीत सल्ला भास्कर जाधव यांनी दिला. मी उद्या श्रीराम प्रतिष्ठापना माझ्या कार्यालयात धुमधडाक्यात करणार आहे. तुम्हीही सर्वांनी धुमधडाक्यात साजरा करा कारण राम सर्वांचा आहे. राम कुणालाही राजकारणासाठी वापरता येणार नाही. आज कुठे आहे बजरंग दल? कुठे आहे विश्व हिंदू परिषद? कुठे आहे प्रवीण तोगाडिया? कुठे आहे विनय कटीयार? कुठे आहे उमा भारती? आणि कुठे आहे लालकृष्ण अडवाणी? असा खरमरीत सवाल आमदार जाधव यांनी उपस्थित केला.