मुंबई- ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचे रूपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे, यासाठी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. येत्या दि.22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही सांगितले. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Campaining) अंतर्गत आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे.