[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]

भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न जोरदारपणे गाजत आहे. जमातुल मुस्लिमीन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने जुना फणसोप येथे मांडवी बंदरातील गाळाच्या प्रश्नासंदर्भात आयोजित केलेल्या सभेला मच्छिमार आणि ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

भाट्ये खाडी परिसरातील राजिवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आणि इतर गावामध्ये मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. मासेमारी व्यवसायावर येथील हजारो कुटुंबिय अवलंबून आहेल. त्यामुळे भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळामुळे येथील मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे मच्छिमार संघर्ष समिती गाळाची समस्या शासन दरबारी मांडत आहे. कारण मांडवी बंदरातून मासेमारीसाठी समुद्राल ये-जा करण्याचा एकमेव मार्ग आहे. गाळामुळे हा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, हा गाळ उपसण्यासाठी गेली कित्येक वर्ष स्थानिक मच्छिमार संस्थांकडून शासनाला निवेदने देण्यात आलेली आहेत. मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर हा प्रश्न मच्छिमार संषर्घ समितीने हाती घेतला असून अनेकदा शासनाला निवेदने देऊनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे मच्छिमार संघर्ष समितीने मच्छिमारांना बरोबर घेऊन २६ जानेवारी, २०२४ रोजी बेमुदत उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी राजिवडा, कर्ता, फणसोप, भाट्ये येथे मच्छिमारांच्या सभा आयोजित करण्यात येत आहेत. नुकतीच जुना फणसोप येथे मच्छिमार आणि ग्रामस्थांची सभा झाली. या सभेत मच्छिमारांनी संघर्ष समितीने घेतलेल्या बेमुदत उपोषणाच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला. यापुढेही मच्छिमारांच्या हितासाठी मच्छिमार संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय यावेळी मच्छिमारांनी घेतला.

या सभेला कोअर कमिटीचे अध्यक्ष नजीर वाडकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष दरबार वाडकर, जाविद होडेकर, इमरान सोलकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मच्छिमारांसमोर आपले विचार व्यक्त केले. तर मुनीर मुकादम यांनी आभार व्यक्त केले. यावेळी फणसोपमधील मच्छिमार, ग्रामस्थ तसेच राजिवडा कोअर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.