[ संगमेश्वर ]

उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख नाहीत असं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल देताना म्हटल्या नंतर सत्ताधारी म्हणाले आमदार अपात्रतेचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे. तर मग ही लोकशाही बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी AB फॉर्म दिल्यानंतर आमदार आणि खासदार झालेल्या मुख्यमंत्री शिंदेसह त्यांच्या सर्व लोकांनी आमदारकीचे राजीनामे द्यावेत अशी प्रतिक्रिया गाव विकास समिती अध्यक्ष उदय गोताड यांनी आमदार अपात्रता प्रकरणावर दिली आहे.

आमदार अपात्रता प्रकरणावरील निकाल हा लोकशाही नितीमुल्यांचा पराभव करणारा असून कायद्याचा चुकीचा अर्थ कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो याचा ऐतिहासिक निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिल्याचा टोला गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी लगावला आहे. हा निर्णय म्हणजे एखाद्या राजकीय पक्षांनी मेहनत करून आमदार निवडून आणायचे आणि त्या आमदारानी पक्षाच्या विरोधात जाऊन पक्ष कसा बळकवायचा याचा राजमार्ग सांगणारा आहे असेही उदय गोताड यांनी म्हटले आहे. 

जर उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद हा निकाल देताना मान्य नसेल तर त्या पक्षप्रमुखांनी दिलेला एबी फॉर्म व त्यावर निवडून आलेले आमदार यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी नैतिक जबाबदारी म्हणून स्वतःला अपात्र घोषित करून आमदारकी व खासदारकीचे राजीनामे द्यावेत आणि भारतीय लोकशाही बळकट करावी असे आवाहन गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केले आहे.