दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi Liquor Scam Case) अंमलबजावणी संचालनालयानं (Enforcement Directorate) बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) हजर झाले नाहीत.

त्यांनी त्यांचं लेखी उत्तर ईडीला (ED) पाठवलंय. तसेच, तपास यंत्रणेची नोटीस बेकायदेशीर असल्याचं आम आदमी पक्षाचं (Aam Aadmi Party) म्हणणं आहे. दरम्यान, ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटकही करू शकते, असा दावाही काही आप नेत्यांनी केला आहे. ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते. त्यानंतर त्याला अटकही होऊ शकते, असं दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे.

ईडीनं वारंवार समन्स बजावूनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीनं बुधवारी तिसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्सवरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. अशा परिस्थितीत ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा त्यांना पुन्हा समन्स पाठवण्याचा विचार करत आहेत. तपास यंत्रणा येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करू शकते, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.