शिरुर -  दिपावली साहित्याचे छोटे-मोठे स्टॉल मुख्य बाजारपेठेजवळ हुतात्मा स्मारक ते लोखंडे कॉम्प्लेक्स पर्यंत स्टॉल लावण्यासाठी जागा आखुन देण्यात आलेली असून या जागेमध्ये स्थानिक पथारीवाले व व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी स्मिता प्रदिप काळे यांनी दिली आहे . दिपावली सणानिमित्त शिरूर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दिपावली सणाकरीता आवश्यक असणा-या वस्तुंची व साहित्यांची विक्री करण्यासाठी पथारीवाले, विविध स्टॉल व इतर दुकानदार यांच्याकडे दिपावलीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मागील वर्षी व्यावसायिक व पथारीवाले यांच्या शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यवसायामुळे रहदारी व गर्दी चे प्रमाण हे भरपुर झाल्याने व्यवसायिक व नागरिकांना फार अडचणीचे झालेले होते. या पार्श्वभुमीवर १६ ऑक्टोबर व दिनांक २७ऑक्टोबर२०२३ रोजी नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या समवेत शहरातील पारंपारिक व्यावसायिक व विक्रेते बांधव यांचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली यात झालेल्या चर्चेप्रमाणे मुख्य बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी व रहदारी पाहता विविध प्रकारचे दिपावली साहित्याचे छोटे-मोठे स्टॉल मुख्य बाजारपेठेजवळच थोड्याशा अंतरावर म्हणजे शिरुर शहरामधील मुख्य रस्त्यावरील हुतात्मा स्मारक ते लोखंडे कॉम्प्लेक्स पर्यंत स्टॉल लावण्यासाठी जागा आखुन देण्यात आलेली आहे. या जागेमध्ये स्थानिक पथारीवाले व व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती शिरूर मधील नागरिकांना व व्यवसायिकांना व्हावी याकरीता, रिक्षा माईक स्पिकर द्वारे आणि घंटागाडीवरील स्पिकरद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी नगरपरिषदेकडून करण्यात आली असल्याचे काळे यांनी सांगितले . या कामी वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजय जगताप व पोलीस कर्मचारी यांचे मोठे सहकार्य मिळाल्याचे मुख्याधिकारी, स्मिता काळे, यांनी सांगितले .