कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये क्रांतिदिन साजरा
कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता.शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरेगाव भिमा येथील क्रांतिवीर दौलती नाईक व स्वातंत्र्य सेनानी मारुती भिमाजी भांडवलकर यांना अभिवादन करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोरेगाव भीमातील भांडवलकर कुटुंबीयांनी मोठे योग दिले होते. यात वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वातंत्र्य संग्रमात दौलती नाईक यांचा मोठा वाटा होता तर महात्मा गांधीजींनी उभारलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनात मारुती भिमाजी भांडवलकर यांनी भाग घेतला होता. त्यांना येरवडा कारागृहात जेल ही झाली होती. या त्यांच्या कार्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या पंचविसाव्या वर्षानिमित्त १५ ऑगस्ट १९७२ रोजी ताम्रपट देत गौरव केला होता.
देशभरात क्रांतीदीन साजरा होत असताना कोरेगाव भिमा ग्रामपंचायतीच्या वतीने क्रांतिकारकांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करत त्यांना मोठ्या आदरपूर्वक विनम्रतेने अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य सेनानी मारुती भांडवलकर यांच्या प्रतिमेचे पूजन कुमारी स्वरा नागेश गव्हाणे व सुरेश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रांतिकारक मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या कार्याची व त्यागाची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, प्रदीप काशीद, नागेश सुखदेव गव्हाणे, सुरेश गव्हाणे, सोमनाथ अजगर, दिलीप ढेरंगे,सचिन मोहिते, सुजाता गव्हाणे, सागर गव्हाणे, आनंदा पवार, मच्छिंद्र डफळ उपस्थित होते.
****** स्वातंत्र्य संग्रामात दौलती नाईक व मारुती भांडवलकर यांचे योगदान मोठे ******
कोरेगाव भीमा हे ऐतिहासिक वैभवशाली वारसा असणारे गाव असून गावातील दौलती नाईक व स्वातंत्र्य सेनानी मारुती भांडवलकर यांच्या स्मरणार्थ भवन उभारण्यात येत असून येथे क्रांतिकारकांच्या संघर्ष त्याग, आणि बलिदान यांची माहिती देणारे चित्रे व साहित्य , स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्यात येणार असल्याचे सरपंच अमोल गव्हाणे व ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी सांगितले.