निमगाव म्हाळुंगी येथे मराठा समाजाचा 'आधी आरक्षण, मग इलेक्शन'चा नारा

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाची ठिणगी पेटत असून, मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत. मात्र सरकार दुर्लक्ष करीत असुन जो पर्यत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मागे हटायचे नाही असा निर्धार करत निमगाव म्हाळुंगीतील मराठा समाजाच्या वतीने 'आधी आरक्षण, मग इलेक्शन'चा नारा देण्यात आला. 

निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिरामध्ये शुक्रवार(दि.२७) रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातुन मराठा आरक्षण जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यानंतर पार पडलेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी उभे केलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू असेपर्यंत आणि मराठा समाजाला कायदेशीरदृष्ट्या टिकेल असे आरक्षण सरकार जोपर्यंत जाहीर करीत नाही तोपर्यंत संविधानिक पदावर काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या आजी माजी पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सकल मराठा समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.