शिरूर - मातीशी व शेतीशी नाते जोडा व माती अन शेती टिकवा व नैसर्गिक शेती करा असे आवाहन बीजमाता व पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपरे यानी शिरूर येथे केले. येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात विद्यार्थिनी मंच व महिला लैंगिक अत्याचार निवारण समिती यांच्या वतीने ‘ सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा ‘ ही विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे . व्याख्यानमालेचे उदघाटन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी केले . अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते. यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रकाश बाफना, शिरीष बरमेचा, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती नीलेश खाबिया, शिरूर तालुका मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.चंद्रकांत धापटे, कामिनी बाफना, संतोष सांबारे , प्रा.डॉ.पी.एस.वीरकर, प्रा. डी.के मांडलिक आदी उपस्थित होते. पोपरे यांचे ‘ देशी बियाण्यांचे जतन व संर्वधन ‘ या विषयांवर व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या की आपली शेती व शेतीतील रानभाज्यांचे जतन व संवर्धन करा. आपल्या शेतजमिनीला विसरू नका, आपल्या शेतातील भाज्या आपल्या जेवणाच्या ताटयात असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक गावात बीजबँक व एक राहीबाई पोपरे तयार झाल्या पाहिजेत. पुढच्या पिढीसाठी चांगली माती व चांगला निसर्ग आपण ठेवला पाहिजे. मातीचे आरोग्य सांभाळा उद्या माती जर संपली तर काय करणार असा सवाल करीत ज्याप्रमाणे आपल्या आईच्या आपण सांभाळ करतो. त्याप्रमाणे मातीचाही सांभाळ करा. माती चांगली राहिली तर उद्या पिके चांगली येतील असे त्या म्हणाल्या. आपल्या शेतात आपण फक्त शेणखताचा वापर करतो असे सांगून आपणांस जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या त्यावेळेस आपण टोमॅटोचे पीक काढत होतो असे सांगत मातीशी नाते जोडल्यामुळेच आपणांस पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे पोपरे यांनी दिली. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवातील विजेत्या विद्यार्थिनी सानिया शेख, प्रियंका मुसळे व नेहा लांडे यांच्या सन्मान राहीबाई पोपरे यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे सचिव नंदकुमार निकम व प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांची यावेळी भाषणे झाली. विद्यार्थिनी मंचच्या समन्वयक प्रा. डॉ. क्रांती पैठणकर(गोसावी) यांनी व्याख्यानमालेविषयी माहिती दिली व प्रास्ताविक केले. महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. पल्लवी ताठे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. राजश्री नवले यांनी मानले.