आठवडाभरापासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे नागरिकांना दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शेतातील उभ्या पीकात पाणी साचले. त्यामुळे खरीप पीकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच खरीपाच्या उत्पन्नावर याचा विपरित परिणाम होणार असल्याने बळीराजा पुरता धास्तावला आहे. खरीपाची पीके आता कोळपणी, खुरपणी तसेच मशागतीला आली आहेत. मात्र, या पिकांमध्ये पाणी साचले आहे. ज्या भागात अतिवृष्टी होत आहे, त्या भागातील शेती पीकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी लावून धरली आहे.