पाचोडसह परिसरातील कपाशीवर थ्रिप्स रोगाचा हल्ला
पाचोड (विजय चिडे)
दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकऱ्यांचे पिकांवर होत आहे.पाचोडसह परिसरातील मुरमा, कोळीबोडखा, थेरगाव, दादेगाव, लिंबगाव, रांजणगाव दांडगा,हर्षी, सानपवाडी,केकत जळगाव,वडजी,पाचोड खुर्द परिसरात कपाशी पिकावर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने जोरदार हल्ला चढविला आहे. त्यासोबतच अळी आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.पाचोड परिसरात मोठ्या खंडानंतर पावसाचे पुनरागमन झाल्याने बऱ्याच प्रमाणात कपाशीला जीवदान मिळाले आहे. मात्र, याचा आनंद फार काळ टिकला नाही. पावसानंतर कपाशीवर थ्रिप्सने हल्ला केल्याने कपाशीची पाने लाल झाली थ्रिप्स हा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.