मैत्री

आयुष्यात जन्म घेतल्या नंतर काही नाती आपल्यास जन्मजात मिळत असतात . पण जन्मा नंतर ते मृत्यू पर्यत प्रत्येकाचा आयुष्यात काही नाते निर्माण होत असतात. त्या सर्व नात्यात एक खास नात असते ते म्हणजे मैत्रीचे नाते. या नात्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे नाते आपण निर्माण केलेले असते. आपल्या स्वभावाने, आवडीनिवडीने आपल्या वागण्या बोलण्यातून हे मैत्रीचे नाते बंध निर्माण होतात. खर तर मैत्रीची अशी नाती ही आपली अमूल्य अशी ‘अॅसेटच ’ . आणी हो अशी मैत्रीची संपत्ती ज्याकडे सर्वात अधिक असते तो माणूस हा सर्वात आनंदी व सुखी असतो. कदाचित बँकेच्या अकाऊंट मध्ये त्याचा पासबुकात पैसाचा बॅलन्स कमी असू द्या इतर मालमत्ता व दागिने जमीनजुमला या सर्व बाबी कमी असल्या तरी ज्याकडे मैत्रीच्या साठा व संचय असतो ती व्यक्ती सर्वात सधन ठरते. कारण ज्याच्या अंगणात मैत्रीचे झाड मोहरलेले असते. आणी मैत्रीचे भरभक्कम छत व आधार असतो त्यास ‘ येवू दे कितीही संकटे, अन वादळे तो त्यावर मैत्रीच्या पाठबळावर मात करतोच . आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात कुटुंबातील सदस्या व्यतिरिक्त अनेक जण येत असत्तात. आपल्या परिचयाचे होतात आणी त्यातून काहीशी असे काही मैत्रीचे सूर जुळतात की ते जणू आपल्या आयुष्याचे कुटुंबाचे भाग बनून जातात. अर्थात ही नाती मैत्र व स्नेहातून निर्माण होतात. ही नाती आपणांस आनंद देतात उर्जा व प्रचंड असे बळ देतात. या नात्या कडे आपल्या मनातील अनेक गुपिते , भावना ,विचार हक्काने शेअर करतो की जी आपण इतरांना बोलू शकत नाही . मनातील सगळ्या गाळ जणू त्याच्या कडे बोलून रिता करतो अगदी मुक्तपणे व्यक्त होतो आपण मित्रांपाशी . कुणीतरी आपल ऐकून घेतय, कुणीतरी आपल्याला समजून घेतय ,कोण्याला तरी आपल्याशी संवाद करावसा वाटतो,, बोलावेसे वाटतय, हे सगळ आपणांस नवीन जगण्याचे बळ देत असते. आणि मनातील व्यथा ,दु;ख, ताण तणाव आनंद सगळे आपण आपल्या मित्रापाशी व्यक्त करीत असतो. त्याच्या खांदावर डोके ठेवून व गळ्यात पडून मनसोक्त रडतो आणी त्यची आश्वासक पाठीवरची थाप व ‘मै हु ना ‘ चे बोल जगण्यासाठी नवी उर्मी,नवे बळ, नवी उमेद देते. जणू पंखात बळ भरते अन हताश,निराश झालेले मन मग नवीन आशा व नवीन उमंगचा तेजाने उजळून निघते. प्रत्येकाचा आयुष्यात असे नितळपणे,मोकळेपणाने व्यक्त करता येणारे मैत्र असले पाहिजे .जिथे सगळी सुख, दु;ख आपणास विरघळून टाकून नव्याने जगण्याचे भान मिळते असे मैत्र असणे हे आपले वैभव असते. कोणत्याही आडपडदा न ठेवता मुक्तपणे संवाद साधल्याने मनातले नैराश्य, नकारात्मकता व ताण बाहेर पडला की मन हलक होत. मनात असा ताण द्वेषा, आकस पूर्वग्रह संशय, नकारात्मकता, उदासीनता, अरसिकता, एकलकोंडेलपणा अश्या बाबींचे तुम्ही गोडावून करून ठेवले तर एकना एक दिवस या सा-या बाबी तुमचा शरीरावर व मनावर ताण आणून तुमचे आरोग्य बिघडविणार हे नक्की. हे तुम्ही टाळू शकता. ‘ जोडूनिया उत्तम मित्र आणि साधोनि त्याच्याशी सुसंवाद, जीवन कर रे सुखाचा सागर ‘ हा मंत्र जीवनात आचरणात आणला तर आयुष्यात प्रसन्नतेचा फीलगुड तुम्ही अनुभवू शकता. त्यासाठी हा मंत्र ‘ करके तो देखो ‘ यानुसार आचरणात तर आणा. अवघे जीवन बदलून जाईल मित्रानो . मैत्रीत निरागसता,निस्वार्थीपणा व स्नेह ,सुसंवाद असला पाहिजे . पण काही वेळेस मैत्रीमध्ये खुन्नस निर्माण होते. मतभेदाचे मनभेदात रुपांतर होते. मैत्री पेक्ष्या व्यवहार मोठा होतो .प्रेमा पेक्ष्या स्वार्थ जोपासला जातो. आणी सहकार्य ऐवजी जीवघेणी स्पर्धा ही आपआपसांत निर्माण होते. या सर्व गोष्टी वेळीच सावरायला नाही तर नात्यात दुरावा निर्माण होतो .संवाद तुटतो. अबोला धरला जातो. जिथे मैत्रीवर स्तुतीसुमने उधळले तिथे शिव्याशाप यांच्या लाखोल्या वाहिल्या जातात. आणि जणू आयुष्य ही रणभूमी बनून जाते. सदाकाळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते. एकमेकांविषयी विश्वास वाटण्या ऐवजी अविश्वास, गैरसमज निर्माण होतात. एकमेकांविषयी द्वेष करणे, विविध व्यक्तीच्या नात्या संदर्भात गॉसिप करणे, नको त्या वेळी नको त्या शब्दात टोमणे मारणे, बोलण्याचा विपर्यास करणे, बोललेल्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावणे, आणि मग शब्दाचा आधारे मनावर आरपार वार करणे त्यातून मनावर झालेल्या खोल जखमा, उमटला गेलेल्या ओरखडा आणि रक्त ही सांडता उध्वस्त केलेले मन हे सारे सहन करण्या पलीकडे जाते आणी मग अश्या मैत्रीच्या नात्यात राहण्या ऐवजी अश्या नात्यास अलविदा म्हण्याची वेळ येते. खूप कठीण असते असे मैत्रीला अलविदा करणे पण शेवटी कोणत्याही गोष्टीला कीड लागली की ही कीड अन्यत्र पसरू नये म्हणून कीड काढावी लागते. तसे मैत्र रुपी झाड बहरण्यासाठी जगणे अवघड करणारी नाती ही छाटावी लागतात. शेवटी त्रास होतो पण शेवटी ती नाती दुरावतात . पण या नात्यांना वेळीच बायबाय केलेले चांगले. कधी अश्या पद्धतीने नाते दुरावली जातात तर कधी परिस्थिती आपल्या हातात नसते. त्यामुळे तुटलेल्या माळी मधून मणी गळून पडावेत अथवा एखादी एखादी वस्तू हातातून निसटून जावीत्त. तशी काही नाती आयुष्यातून निसटून जातात कळत नकळत तरी जगणे मात्र जगावे लगते. माणूस लहानपानापासून ते मृत्यू पर्यत मैत्रीचे सर्कल वाढवीत असतो. हे सर्कल छोटे ठेवायचे की मोठे हे व्यक्तीच्या स्वभाव त्यातील गोडवा, स्नेह आपुलकी, आदर, इतरान विषयी आस्था, जिव्हाळा आणि आवडी निवडी, छंद, मनमोकळेपणा या आणि इतर अनेक बाबींवर तुमचे मैत्र सर्कल वाढत राहते. कुण्याला अवघ्या एका बोटावर मोजण्या इतके मित्र तर कोण्याचे मोजता येणार नाही एवढ्या मैत्रीचा गोतावळा. शेवटी मैत्री करणे तिला रुजविणे, फुलविणे आणि वाढविणे हे सर्वस्वी तुमच्या स्वंत:वर अवलंबून आहे. ‘ ना बाजार मे दोस्ती बिकती है, ना दोस्ती कोई खरीद सकता है, दोस्ती सिर्फ कमाई जा सकती, वह प्यार मोहब्बत से . हे मी नाही सांगितले. मागच्या पिढीतील बुजुर्गानी त्याच्या जीवनात आलेल्या अनुभावातून व्यक्त केलेले सत्य आहे. शाळेची बालपणाची मैत्री ही आपणांस हवीहवीशी वाटणारी असते पण बालपण हातातील आईस्क्रीमचा कोन मधील आईस्क्रीम जशी पटदिशी संपून जाते अथवा विरघळून जाते. तस बालपण संपून जाते. मग शाळा ,कॉलेज असे मित्राचे सर्कल वाढते. सर्कल वाढते पण लग्न संसार आणि मग व्यवसाय नोकरी यांचे व्याप यातून तर मग मित्र दुरावले जातात. एकाच शहरात राहून ही भेटणे बोलणे दुरापस्त होते. काही जण आता व्हॅटसअप व सोशल मिडीयाचा जमान्यात हे मैत्र सुप्रभात आणि इमोजीचा मेसेजवर जगवण्याचे प्रयत्न करतात तर काहीना तर हे मेसेज पाहायला ही फुरसत नाही. इतके दोस्त सारे बिझी झाले आहेत. बाहेर कोठे तरी भेटू निवांत बोलू ,निवांत बसू असे म्हणत भेटीची वादे केले जातात पण भेटी काही होत नाही. मग वर्षातून एकदा गेट टू गेदर व सहलीचा निमित्ताने एकत्र येत वर्षभर पुरेल एवढ्या मैत्रीचा आनंदाचा ठेवा आपल्या आठवण कुपीत साठवून घेवून जातात आणि वर्षभर या आठवणीच्या आधारे जगत असतात. कोरोनाच्या काळात स्पर्शाची,सहवास,मानवी नाते सबंध आणि जीवनाची किमंत प्रत्येकाला जाणविली. गरजे पेक्षा अधिकच्या हव्यास चंगळवादी जगणे, नको इतक्या सर्व गोष्टीचा उपभोग हे मिळविण्यासाठी आपण काय काय गमावीत आहोत. जगण्यासाठी नेमके काय हवे किती हवे हे कोरोनाने सर्वाना शिकविले. तरी आपण धावत सुटलो अश्या शर्यतीत की या शर्यतीत कोठे थांबायचे हे माहीतच नाही त्यामुळे ती जिंकण्या न जिंकण्याचा प्रश्नच नाही. एकीकडे मुले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपली मैत्री निभावू शकण्यासाठी निदान एकमेकांना फोन मेसेज करणे किंवा गेट टू गेदर व सहल व अन्य काही कारणाने भेटू शकतात. पण मुलीच्या मैत्रीचे काय मुली पुढे लग्न होवून संसारात पडल्या की नवरा व घरच्यांची मर्जी राखणे, नोकरी, व्यवसायकरीत असतील तर नोकरी व्यवसाय सांभाळून कुटुंबाची कर्तव्ये पार पडणे या सारख्या गोष्टीत गुरफटून जातात . आपल्या स्वंत;चे एक विश्व आहे. त्यात कुटुंबा बरोबरच आपले मित्र मैत्रिणी आहेत हे जणू विसरूनच जातात. त्यामुळे लग्नानंतर असे मैत्रीचे बंध जुळून ठेवणे ज्या कोण्यास जमले व आपल्या मैत्रिणीचे सर्कल जपुन ठेवले त्यांना त्रिवार सलाम . आता सोशल मिडीया ने चित्र बदलत आहे. अनेक मैत्रिणी व्हॅटसअप व अन्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून मैत्रीचे सर्कल घट्ट करण्यासाठी टिकविण्यासाठी पुढे येत आहे हे नक्कीच मैत्री वाढविण्यासाठी टिकण्यासाठी आशादायी चित्र आहे. अजून मैत्री म्हटले की मुला मुलांची किंवा मुली मुलींची असे मानल जात आहे. आता हळूहळू चित्र बदलत आहे. काळ बदलत चालला आहे. त्यामुळे मुले मुली असा भेद न होता मुलेमुली याच्यात ही चांगले मैत्र निर्माण होत आहे. निर्मल मन व निस्वार्थी दुष्टीकोन व मोकळेपणा यातून कोणत्याही नात्यात चांगले मैत्र निर्माण होत असते. कोणत्याही नात्यात ज्या मर्यादा असतात त्याची जाणीव असेल तर ही नाती अधिक व्यापक दोन्ही बाजूने होत असतात. कोरोनाच्या काळात आपण संपूर्ण जग व मानवाची अवस्था पाहिली. जीवन हे क्षणभंगुर आहे. ताणतणाव व स्पर्धा व स्पर्धेतील नित्य असणारी आव्हाने.बदलती परिस्थिती, बदलते हवामान, युद्धजन्य परिस्थिती, वाढत चाललेल्या एकलकोंडलपणा, भौतिक सुखाचा वाढत्या हव्यास , जीवघेणे साथीचे आजार व विकासाचा नावाखाली ओरबडत जात असलेल्या निसर्ग अशी एक ना अनेक प्रश्नांची मालिका उभ्या ठाकलेल्या असताना मानवी मन हे अस्थिर होत चालले आहे. अनामिक भीती व दडपण यामुळे या मनाला उभारी व उर्जा देणारे एकमेव नाते आहे ते म्हणजे मैत्रीचे नाते, आपल्यातील भीती ,अस्वस्थता ,निराशा नकारात्मकता उदासीनता आणि सा-या संकटाशी तु भिडू शकतो , तु लढू शकतो आणी तु जिंकू शकतो .मित्रा तु एकट्या नाही मै हु ना असे म्हणत तो आपल्या खांदावर हात ठेवून संपूर्ण जग जिंकण्याचा आत्मविश्वास आपल्या मध्ये निर्माण करू शकते ते नात हे मैत्रीचे असते. असे मैत्रीचे पाठबळ हे लाखो बीमारी कि दवा है. दोस्ती सारा जगाशी पंगा घेत, दु;खाचा प्रसंगी ठामपणे अश्रू पुसते . दोस्ती अडचणीचा पुढे ढाली सारखी उभी राहत मित्रासाठी लढत असते. दोस्ती धर्म जात पंथ या पलीकडे जावून प्रेम व स्नेहाची भिंत बनून उभी राहते. येता संकटे अन आव्हाने,भिडण्या दोस्ती पहाडा सारखी मागे उभी असते. दोस्ती जिंदाबाद @सतीश धुमाळ @