शिक्रापुर येथे कॉम्प्लेक्सला पहाटेच्या सुमारास भीषण आग
-दोन दुकाने जाळून खाक तर पोलिसांच्या सतर्कतेने महिलांचे वाचले प्राण
आकाश भोरडे
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील बांदल कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील दोन दुकानांना आज शनिवार (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून दोन दुकाने जाळून खाक तर एका मेडिकलचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाच्या दोन तुकड्यांना आग विझवण्यात यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातील बांदल कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील एका केक शॉपला रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील एका फोटो स्टुडीओला वेढा घातला, घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, शिवाजी चितारे, होमगार्ड वैभव बिडकर, उद्योजक बापूसाहेब बांदल, सदाशिव पुंडे, दत्ता कवाद, अतुल सासवडे, विक्रम ठाकूर यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली, दरम्यान आगीने रौद्ररुप धारण केले होते, याबाबतची माहिती शिक्रापुर पोलिसांनी तातडीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलांना दिली. यावेळी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काही महिला असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस हवालदार शंकर साळुंके यांनी तातडीने वर जावून महिलांना सुरक्षितपणे खाली आणले, काही वेळातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाचे नितीन माने, महेश पाटील, प्रशांत चव्हाण, प्रकाश मदने, सुरज इंगवले तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाचे सीतेश गायकवाड, अमोल गायकवाड, किशोर सांगळे, भाऊसाहेब बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र आगीने दोन दुकानांना वेढा घातल्याने केक शॉप व फोटो स्टुडीओच्या दुकानांचे पूर्णपणे नुकसान झाले तर केक शॉप शेजारील एका मेडिकलचे काही प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीही हानी झाली नसून सदर आगीमध्ये तब्बल पाच लाखांचे नुकसान झाले असून केक शॉप मध्ये झालेल्या शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.