विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटूंबाचे जीवनमान उंचावावे,त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी तसेच त्यांनी विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे.यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,रमाई आवास योजनेच्या धर्तीवर अथवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक पात्र लाभार्थी कुटूंबासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

            या योजनेच्या लाभासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे आहे.

लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील असावे.लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष २० हजार रुपयाच्या आत असावे.लाभार्थी कुटूंब बेघर अथवा कच्चे घर/झोपडी/पालामध्ये राहणारे असावे.लाभार्थी कुटूंब अल्पभूधारक असावे.लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थी कुटूंबाने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.लाभार्थ्याचे वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्य असावे.या योजनेचा लाभ पात्र कुटूंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल.ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरीता स्वत:ची जागा आहे, असे लाभार्थी योजनेअंतर्गत केवळ वैयक्तिक लाभास पात्र राहतील. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करतांना विधवा/विधुर/अपंग/अनाथ/परितक्त्या व वयोवृध्द या व्यक्तींचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. या योजनेसाठी कुटूंब म्हणजे पती, पत्नी व त्यांची अविवाहित अपत्ये यांना कुटूंब समजण्यात येईल.तसेच ही योजना नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात लागू राहणार नाही.

            पात्रता व निकषाची पूर्तता करणारे विमुक्त जाती,भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजीविका करणारे पात्र लाभार्थी हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी यांचेमार्फत परिपूर्ण कागदपत्रांसह आपले अर्ज सहायक आयुक्त,समाज कल्याण यांचे कार्यालयास सादर करावे.असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.