कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटना वाघोली आणि रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली आणि पिंपरी विद्यालयातील शिक्षकांसाठी विशेष विद्यार्थ्यांच्या अध्यापनात शिक्षकांना येणाऱ्या समस्या, उपाय आणि शिक्षकांची भूमिका यावर एक दिवशीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष विद्यार्थ्यांना तसेच अध्यापनात गती नसणाऱ्या मुलांना विशिष्ट व सोप्या पद्धतीने त्यांच्या बुद्ध्यांकाप्रमाणे शिकवण्याची अतिशय गरज असते.त्याशिवाय ते विद्यार्थी इतर मुलांच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत.
रोटरी क्लबच्या प्रा. सौ. उर्मिला हळदणकर (शिक्षण क्षेत्रातील तज्ञ) यांनी अध्यापनात गती नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणत्या शिक्षण पद्धतीचा वापर करायचा, स्मार्टफोनची मदत कशी घ्यायची तसेच दृकश्राव्य साधने, शिकवलेल्या धड्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग, बोर्ड गेम्स यांचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने देता येतील याचे मार्गदर्शन केले.
तसेच रूता दाते (बाल मानसोपचार तज्ञ) यांनी या मुलांमध्ये अध्ययन कौशल्य विकसित होण्यासाठी शिक्षकांविषयी तसेच इतर सहकारी विद्यार्थ्यांविषयी विश्वास, आपुलकी निर्माण होणे आवश्यक आहे आणि हे गप्पागोष्टी व साध्या-साध्या वर्ग कृतींमधून साध्य होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. ही कार्यशाळा आयोजनासाठी रोटरीचे प्रा. उज्वल तावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयातील शिक्षक राजेंद्र जायभाय यांनी केले.
तर सदर कार्यशाळेसाठी बीजेएसच्या वाघोली विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी, पिंपरी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख तसेच दोन्ही विद्यालयातील शिक्षक बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा घेण्यासाठी रोटरी क्लब पुणे कोथरूडचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ लेले, सेक्रेटरी निना पांगारकर, डायरेक्टर राजेश भाटे यांनी विशेष मदत केली.