भूगोलाचा पेपर बाकी तरीही ती झाली पास, मात्र.... 

-शिरुर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

दादा दहावीचा निकाल लागला तुमची प्रगती पास झाली, निकाल पहायला ती नाही असे प्राचार्य अनिल शिंदे यांनी प्रगतीच्या आई वडिलांना सांगितले आणि पलीकडून फक्त हंबरडा ऐकू आला कारण हा निकाल ऐकायला प्रगती जगात नसून प्रगती केव्हाच देवाघरी गेली आहे.

            कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी प्रगती किसन गोरडे ही एक अत्यंत गुणी विद्यार्थिनी. प्रगती वर्गातही ती फारसी बोलत नसायची, आई वडिलांची परिस्थिती अत्यंत नाजूक, साधे सरळ जीवन जगणारे कुटुंब त्यांना तिन्ही मुली मुलगा नाही, गरिबी असूनही हसत खेळत प्रपंचाचा गाडा ओढणारे हे कुटुंब. प्रगती सर्वात थोरली प्रगतीला खूप शिकवायचे आणि तिला नर्स करायची असे तिचे वडील पालकसभेला आले तेव्हा शिक्षकांना सांगायचे. सर्व शिक्षकांनीही तिच्या गरीब परिस्थितीची जाणीव असल्याने मदतीचा हात पुढे केला मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते, अभ्यास करून पास व्हायचे ह्या निर्धाराने व आपल्या गरीब आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रगतीने अभ्यास केला. परीक्षा दिली भूगोल विषयाचा पेपर बाकी होता तेव्हा अचानक घरात प्रगतीचा मृत्यू झाला, मृत्युमुखी पडली, ग्रामस्थांनी कुटुंबाला धीर दिला. जिच्याबद्दल काही स्वप्न पाहिली होती ती सारी धुळीला मिळाली होती. नुकताच दहावीचा निकाल लागला, प्रगतीने एक पेपर न दिलेला मात्र तरीही केवल इतिहासाच्या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांवर प्रगती पास झाली. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. प्रगती गेली पण जाताना आपल्यामुळे शाळेचा निकाल कमी होणार नाही याची जाणीव ठेवूनच गेली, प्रगतीचा निकाल तिच्या आईवडीलांना सांगताना प्राचार्य अनिल शिंदे यांनाही अश्रू आवरले नाहीत. शाळेच्या निकालाच्या शंभर नंबरी परंपरेचा लौकिक अबाधित ठेऊन देवाघरी गेलेल्या प्रगतीबद्दल सारा गाव आज हळहळला असून विद्यालयातून उकिरडे सूरज राजेंद्र याने ९४.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, पुंडे सुरज पांडुरंग याने ९३.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, मिडगुले किरण हिरामण याने ९३.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक, हुंडारे साक्षी दशरथ हिने ९२.४० टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक तर दळवी प्रणव प्रमोद व मिडगुले साक्षी नागनाथ या दोघांनी ८८.८० टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळवत यश संपादित केले असून सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.