महिला उपसरपंचासह इतरांना मारहाण, नऊ जणांवर ॲट्रॉसिटीसह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

 मोराची चिंचोली (ता. शिरुर) येथील ग्रामसभेत झालेल्या वादावरुन केलेल्या भांडणाबाबत माफी मागण्यासाठी मोराची चिंचोलीच्या महिला उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबियांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे महेश कैलास नाणेकर, निखील धैर्यशील नाणेकर, धैर्यशील शिवाजी नाणेकर, सुनिता राहूल नाणेकर, सविता धैर्यशील नाणेकर यांसह तीन अनोळखी इसमांवर ॲट्रॉसिटी सह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                              मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावात १ जून रोजी ग्रामसभा सुरु असताना ग्रामसभेत मतभेद झाले असताना उपसरपंच अश्विनी मोहिते यांच्या जाऊ वैशाली मोहिते यांना गावातील राहुल नाणेकर याने धक्का मारला असताना वैशाली मोहिते यांनी राहूल नाणेकर यांच्या कानाखाली मारली होती, त्यामुळे दुपारच्या सुमारास महेश नाणेकरसह आदी इसम व महिला मोहिते यांच्या घरासमोर लाकडी दांडके, तलवार, स्टंप, लोखंडी फायटर घेऊन आले त्यांनी वैशाली मोहिते हिने आमची माफी मागावी असे म्हणून उपसरपंच अश्विनी मोहिते, त्यांची सासू, पती, जाऊ यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने, लाथाबुक्य्यांनी मारहाण केली, दरम्यान निखील नाणेकर याने तलवार दाखवत राहूल नाणेकरची माफी मागितली नाही तर तुमचे तुकडे करुन टाकीन अशी धमकी देत जातीवाचक, शिवीगाळ करत दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत मोराची चिंचोली गावच्या महिला उपसरपंच अश्विनी विजय मोहिते (वय ३३ वर्षे रा. मोराची चिंचोली ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी महेश कैलास नाणेकर, निखील धैर्यशील नाणेकर, धैर्यशील शिवाजी नाणेकर, सुनिता राहूल नाणेकर, सविता धैर्यशील नाणेकर यांसह तीन अनोळखी इसम (सर्व रा. मोराची चिंचोली ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी सह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव हे करत आहे.