शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा गुन्हा
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात तलाठी कार्यालयात जाऊन महिला गावकामगार तलाठी यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत कार्यालयातील कागदपत्रे फेकून देत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माजी उपसरपंच रमेश राघोबा थोरात यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील तलाठी सुशिला गायकवाड या कार्यालयात कामकाज करत असताना माजी उपसरपंच रमेश थोरात कार्यालयात आले, त्यांनी तलाठी गायकवाड यांना माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले तरी तुम्ही नोंदणी का करत नाही असे म्हणून महिला तलाठी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला, त्यांनतर गायकवाड यांना जातीवाचक बोलून तलाठी कार्यालयातील कागदपत्रे फेकून देऊन रागाने बोलून दरवाजात जाऊन शिवीगाळ, दमदाटी करुन यांची बादलीच करतो असे म्हणून निघून गेले, घडलेल्या प्रकाराबाबत शिक्रापूरच्या तलाठी सुशिला शंकर गायकवाड वय ४१ वर्षे रा. विकास सदन, खंडोबा मंदिर जवळ वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूरचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रमेश राघोबा थोरात रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी सह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.