जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे अॅपद्वारे होणार; अतिवृष्टीसाठी सज्ज राहण्याच्या सूचनार
रत्नागिरी : पावसाळ्यात आणि अतिवृष्टीत भेडसावणाऱ्या संभाव्य आपत्ती काळात ज्या मालमत्तांचे, शेती-बागायतींचे नुकसान होणार आहे. त्यांचे पंचनामे अॅपद्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहेत. त्यामुळे तत्काळ पंचनामे कृषी किंवा महसूल विभागाकडून करण्यात येणार असून तशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. अतिवृष्टी काळात घडणाऱ्या आपत्तींबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातच राहून कायमस्वरूपी सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
प्रामुख्याने चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही भाग हा पावसाळ्यात संवेदनशील असतो. तसेच इतरही ठिकाणी अचानक काही घटना घडत असतात. विशेष म्हणजे कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दरडी कोसळून महामार्ग बाधित होतो, अशा स्थितीत करण्याच्या उपाययोजनांचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. तसेच महावितरण विभागाने धोकादायक ठिकाणी आतापासूनच सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या तर तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच धोकादायक इमारती निवडून, त्यातील नागरिकांचे स्थलांतर करावे. पंचायत समितीतर्फे शाळा इमारतींमध्ये विशेष लक्ष घालून मुलांना धोका पोहोचणार नाही, यासाठी सज्ज राहण्याचा कृती आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.