लांजा: गर्दीचा फायदा उठवत एसटी बसमध्ये चढताना महिला प्रवाशाची पर्स लांबवल्याचा प्रकार ९ मे रोजी सायंकाळी ४ ते ५:३० वाजण्याच्या दरम्यान लांजा आगारात घडली. यामध्ये १ लाख ५९ हजारांचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ७४ हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी लांजा पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार पती पत्नी दोघे ९ मे रोजी वेळंब (ता. गुहागर) येथून साटवली (ता. लांजा) येथे जाण्यासाठी लांजा बसस्थानकात आले. लांजा बसस्थानकात सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान लांजा साटवली मार्गे इसवली या बसमध्ये ती दोघ चढत होती. या गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी होती.

या गर्दीचा फायदा घेत लांजा ते साटवली हायस्कूल थांबा असा प्रवास करताना कोणीतरी महिलेच्या काखेतील पर्स लांबवली. या पर्समध्ये १ लाख ५९ हजारांचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रोख रक्कम होती. याप्रकरणी लांजा पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.