पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने मित्रांनी चाकूने भोसकून एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरीत घडली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
मोहम्मद गुलशाद यामिन अन्सारी (वय २०, रा. मुनावर सोसायटी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मोहम्मद मुस्तफा अन्सारी (वय २१) आणि सोहेल अन्सारी ( वय २२, दोघे रा. वडगाव शेरी ) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी सोहेल अन्सारीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचे बिहारमधील आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले आहेत. आरोपींनी मोहम्मद याच्याकडे गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तीनशे रुपये मागितले होते. पैसे देण्यास मोहम्मदने दोघा आरोपींना नकार दिला. त्यानंतर आरोपींनी चाकुने मोहम्मदवर वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने तपास सुरू केला. आरोपी बिहारला पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सोहेलला अटक केली. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.