शिरुर दिनांक - (वार्ताहर ) टीडीएम' या मराठी चित्रपटास पुणे मुंबई व अन्य शहरातील थिएटर मधुन प्राईम टाईम या वेळी टीडीएम प्रदर्शित करण्याची वेळ देण्याची मागणी जनता दल धर्मनिरपेक्षचे राज्याचे अध्यक्ष नाथा शेवाळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या कडे केली आहे . निवेदनात म्हटले आहे की भाउराव क-हाडे हे ग्रामीण भागातील एक नवोदित प्रचंड गुणवत्ता असणारे प्रतिभावंत दिग्दर्शक व निर्माते आहेत. यापुर्वी त्यांनी प्रदर्शित केलेले बबन, ख्वाडा या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अश्या या गुणी कलावंताने कर्ज काढुन टीडीएम' हा मराठी चित्रपट काढला आहे. या आठवडात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पुणे व मुंबई तील अनेक चित्रपटगृहात प्राईम टाईमची वेळ टीडीएमच्या प्रदर्शनास देण्यात आलेली नाही. या चित्रपटास मराठी रसिकांच्या मोठ्या प्रतिसाद असताना प्राईम टाईमच्या वेळेत हा चित्रपट पुणे मुंबई येथील चित्रपटगृहात दाखविला जात नसल्याने त्याचा थेट फटका प्रेक्षक संख्या व चित्रपटाचा आर्थिक गणितावर होत आहे. चित्रपट प्राईम टाईम शोला न लावण्याचा मुळे चित्रपट दिग्दर्शक व निर्माता भाउराव क-हाडे व चित्रपट कलाकार निराश झाले असुन भाउराव यांनी मराठी चित्रपटास प्राईम टाईमचा शो मिळणार नसेल मराठी चित्रपटाची अडवणूक होणार असेल तर यापुढे मराठी चित्रपट का निर्माण करावेत असे सांगत यापुढे अशीच अडवणुक होणार असेल तर चित्रपट काढणार नसल्याचे अत्यंत निराशा व दु: खाने सांगितल्याचे निवेदनात म्हटले आहे . महाराष्ट्र हा कलावंताचा व गुणीजणांच्या आदर व सन्मान करणारा आहे. भाउराव सारख्या ग्रामीण भागातील एक उमदा व सर्जनशील व चित्रपटक्षेत्रात नव काही करु पाहणा-या कलावंताचे असे खच्चीकरण होणे हे आपणा सर्वांना विचार करायला लावणारे आहे. ग्रामीण भागातील हे नवोदित कलाकार जपणे व मराठी चित्रपटास प्राईम टाईमची वेळ देणे हे आपली जबाबदारी आहे. टीडीएम चित्रपटास मुंबई व पुणे शहरात प्राईम टाईमची वेळ मिळवुन देण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे .